‘पुण्यातील जंबो कोवीड सेंटर गैरव्यवहार प्रकरणी कंपनीवर गुन्हा दाखल करा’; किरीट सोमय्या यांची मागणी
पुणे जंबो कोविड सेंटरचा कॉन्ट्रॅक्ट घेऊन मोठा गैरव्यवहार
![Kirit Somayya said that a case should be filed against the company in the case of jumbo covid center malpractice in Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/kirit-somaiya-780x470.jpg)
पुणे : खासदार संजय राऊत यांचे व्यवसायिक भागीदार सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल कंपनीने कोणताही अनुभव नसताना पुणे जंबो कोविड सेंटरचा कॉन्ट्रॅक्ट घेऊन मोठा गैरव्यवहार केला आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ झाला, याप्रकरणी पोलिसांनी मुंबई प्रमाणेच पुढील सात दिवसात पाटकर यांच्या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
पुण्यातील शिवाजीनगर जंबो कोवीड सेंटर येथे सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल कंपनी घोटाळा विरुद्ध शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी नगरसेवक दत्ता खाडे, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.
किरीट सोमय्या म्हणाले की, जुलै २०२० मध्ये जंबो कोविड सेंटर सुरू करण्याची योजना महाराष्ट्र शासनाने राबवली. मुंबई येथे मुंबई महापालिकेने तसेच पुणे येथे पीएमआरडीए आणि पुणे महापालिका द्वारा जम्बो-कोविड सेंटर उभारण्यात आले. शिवाजीनगर येथे उभारण्यात आलेले कोविड सेंटर चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या सुजित पाटकर यांच्या कंपनीला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने देण्यात आले. त्यानंतर पीएमआरडीएने याबाबत कॉन्ट्रॅक्ट दिले. मात्र, माहिती अधिकारात आम्हाला लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेसने रीतसर अर्ज केल्याचे, तसेच कंपनी केव्हा स्थापन झाली, अनुभव किती व तीन वर्षाचे टाळेबंद अशी कोणती माहिती दिलेली नाही.
लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटने केवळ एक प्रेझेंटेशन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिले असल्याचे दिसते. त्यावर आधारित ८०० बेडचे जंबो कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिले गेले ही गंभीर बाब आहे. पीएमआरडीए व टास्क फोर्सने जे नियम बनवले होते त्या सर्वांना लाईफ लाईन हॉस्पिटलने दुर्लक्ष केले. अनुभवी डॉक्टर्स नाही, इतर पॅरामेडिकल स्टाफ नाही म्हणून रुग्णांचे हाल झाले. काही दिवसातच तीन रुग्णांचा कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाला. त्यावर पुणे महापालिकेने दोन सप्टेंबर २०२० रोजी पीएमआरडीला यासंबंधी तक्रार व अहवाल पाठवला.तसेच लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विस मध्ये क्षमता नाही तरी त्यांनी काम चालू ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.