‘श्रीराम मांसाहार करायचे हे मी ओघात बोललो’; जितेंद्र आव्हाडांकडून खेद व्यक्त
![Jitendra Awad said that I said that Shri Ram used to eat non-vegetarian food](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Jitendra-Awhad-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल एक मोठं विधान केलं. श्रीराम मांसाहार करायचे, असं ते म्हणाले. आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचा विपर्यास करणं हे माझं काम नाही. काल मी जे बोललो ते ओघात बोलून गेलो, असं आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी महाराष्ट्राला अनेकदा संबोधित करत असतो. मी इतिहासाचा विपर्यास करत नाही. विकृतीकरण माझं काम नाही. मी जे काही बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू श्रीराम, विठ्ठल सगळी एकच रुपं आहेत. मी श्रीरामांबद्दल बोललो की ते मांसाहरी होते. जे याविरोधात बोलत आहेत त्यांच्या माहितीसाठी वाल्मिकी रामायणात एक संदर्भ आहे. त्यातल्या अयोध्या कांडात एक श्लोक आहे. तो मी वाचत नाही कारण मला वाद वाढवायचा नाही.
हेही वाचा – SSC-HSC Exam : दहावी बारावीच्या परीक्षांसंदर्भात एक महत्वाची अपडेट्स!
आमचा राम जात-पात न मानणारा आहे, शबरीची बोरं खाणारा आहे, जे राम-राम करत आहेत त्यांना मी सांगेन की तुमचा राम तुम्हाला निवडणुकीसाठी बाजारात आणायचा आहे, आमचा राम आमच्या जन्मापासून आमच्या हृदयात आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
अन्नपुराणी नावाचा सिनेमा आला आहे. त्या सिनेमात त्यांनी वाल्मिकी रामायणातला श्लोक म्हणून दाखवला आहे आणि त्याचा संदर्भही बोलून दाखवला आहे. मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. आजकाल अभ्यासाला नाही तर भावनांना महत्त्व आहे. माझ्या वक्तव्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याविषयी खेद व्यक्त करतो, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.