‘देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राकडे पाहण्यासाठी वेळ नाही’; जयंत पाटलांची टीका
![Jayant Patil said that Devendra Fadnavis has no time to look at Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Jayant-Patil-and-Devendra-Fadnavis-780x470.jpg)
Jayant Patil | बदलापुरातील शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तसेच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राकडे पाहण्यासाठी वेळ नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
जयंत पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राकडे पाहण्यासाठी वेळ नाही. महाराष्ट्रातील कायदा आणि सुवव्यवस्था पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. याबाबत त्यांना फारसं सोयरसुतक नाही. फक्त सत्ता कशी आणायची? याकडे त्यांचं सर्व लक्ष आहे. देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी मोठी आहे. कारण त्यांच्या भरोवशावर दोन पक्ष अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांच्यात आणि यांच्यामध्ये जास्त काही ताळमेळ नाही. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या असून महाराष्ट्रातील प्रश्न आणि बदलापूर सारख्या गंभीर घटनांकडे बघण्यासाठी त्यांच्याकडे वेळ राहिला नाही, असं मला दिसत आहे.
हेही वाचा – महाराष्ट्रात चाललंय काय? व्हिडिओ दाखवत शिक्षकाकडून सहा मुलींचा विनयभंग
महाराष्ट्रातील महिलांचं देखील असं म्हणणं आहे की राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्हाला देण्यात येणार असलेले १५०० रुपये नको. मात्र, आम्हाला सुरक्षितता द्या. पण महिलांना सुरक्षितता देत असताना राज्यातील कायदा व सुव्यस्था राखण्यास हे महायुतीचं सरकार अपयशी ठरत आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
भारतीय जनता पक्षाचं काहीच खरं नसतं. एकदा त्यांनी ७० हजार कोटींचा आरोप केला. पुढे त्याच लोकांबरोबर सरकार स्थापन केलं. आता नवाब मलिक यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अतिशय गंभीर आरोप केले होते. आता त्याच नवाब मलिक यांना महायुतीत एक जागा देतील अशी परिस्थिती आहे. हे देवेंद्र फडणवीस यांना आणि भाजपालाही मान्य असेल, असं गृहीत धरता येईल. कारण नवाब मलिक यांच्या मतदारसंघात काल मोठा कार्यक्रम पार पडला, असंही जयंत पाटील म्हणाले.