महाराष्ट्रात चाललंय काय? व्हिडिओ दाखवत शिक्षकाकडून सहा मुलींचा विनयभंग

Akola | बदलापूरातील चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे संबंध राज्यभर संतापाची लाट उसळलेली असताना आता आणखी एक घटना समोर येत आहे. अकोल्यातील बाळापुर तालुक्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने ६ मुलींचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिक्षकाने अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्या छळ केल्याचे उघड झाले असून मंगळवारी संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद सरदार असे आरोपीचं नाव असून त्याने विद्यार्थ्यांना अयोग्यरित्या स्पर्श करण्यापूर्वी त्याच्या मोबाइल फोनवर अश्लील व्हिडिओ दाखवला. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अकोला शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या काझीखेडा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात हा अत्याचार झाला. पीडितांपैकी एकाने १०९८ चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल करण्याचे धाडस दाखविल्यानंतर ही घटना उघडकीस आली. तक्रारदाराची ओळख उघड करण्यात आलेली नाही, परंतु तक्रारीमुळे बालकल्याण समितीने (CWC) चौकशी केली.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील माजी नगरसेवक रवि लांडगे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
मंगळवारी सीडब्ल्यूसी सदस्यांनी विद्यार्थ्यांसोबत तासभर सत्र आयोजित करण्याच्या बहाण्याने शाळेला भेट दिली. त्यांनी इयत्ता आठवीच्या वर्गातील मुलींशी वैयक्तिकरित्या बोलण्याची विनंती केली. यावेळी पीडित मुलींनी गेल्या चार महिन्यांपासून त्यांना सहन केलेल्या आघातांची माहिती दिली. मुलींची साक्ष ऐकून CWC सदस्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला.
उरल पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोपाल ढोले यांनी सांगितले, ‘आम्हाला एका CWC सदस्याचा कॉल आला आणि अल्पवयीन मुलींचे जबाब नोंदवण्यासाठी पोलीस पथक शाळेत पाठवले.’ त्यानंतर पोलिसांनी प्रमोद सरदारला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायदा आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला.





