जावेद मियाँदाद यांची BCCI ला धमकी वजा इशारा ः ‘भारताला पाकिस्तानात यायचे नसेल तर येऊ नका…’
![Javed Miandad's warning to BCCI: 'If India doesn't want to come to Pakistan, don't come...'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Javed-700x470.jpg)
नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी बीसीसीआयला चांगलेच धारेवर धरले आहे. मियाँदाद फक्त एवढ्यावर थांबलेले नाहीत तर त्यांनी बीसीसीआयला धमकी वजा इशाराही यावेळी दिला आहे. पाकिस्तानमध्ये खेळण्यास बीसीसीय तयार नसल्याचे गेल्या बऱ्याच वर्षांपासून पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी आशिया क्रिकेट संघटनेची एक बैठक झाली होती. त्यामध्ये बीसीसीआयने पुन्हा एकदा आपण पाकिस्तानमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता मियाँदाद बीसीसीआयवर चांगलेच भडकले आहेत.
मियाँदाद यांनी यावेळी सांगितले की, ” भारताला जर पाकिस्तानमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळायला यायचे नसेल तर त्यांनी येऊ नये. जर भारत पाकिस्तामध्ये खेळायला येत नसेल तर आमचे काही बिघडत नाही. कारण पाकिस्तान आता कोणत्याही गोष्टीवर भारतावर अवलंबून नाही. त्यामुळे आता भारताला जो निर्णय घ्यायचा असेल तो त्यांनी घ्यावा. पाकिस्तान क्रिकेट मंडळ सर्व गोष्टा हाताळण्यासाठी समर्थ आहे.”
मियाँदाद यांनी नरेंद्र मोदी यांनाही केले होते टार्गेट…
मियाँदाद यांनी भारत आणि पाकिस्तान यांंच्यात सामने होत नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टार्गेट केले होते. मियाँदाद यांनी म्हटले होते की, ” भारताला पाकिस्तानबरोबर पराभूत होणे परवडणार नाही आणि त्यामुळेच ते पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या पराभवाला घाबरतात. भारताचा जर पाकिस्तानने पराभव केला तर त्यांचे पंतप्रधान गायब होतील. त्याचबरोबर या पराभवानंतर त्यांची जनता संघाला सोडणार नाही.”
पाकिस्तानमध्ये आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. पण तरीही भारत मात्र पाकिस्तानात खेळण्यास तयार नसल्याचे पाहायला मिळत आहे. भारत जर पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळायला गेला तर त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागू शकतो. त्याचबरोबर पाकिस्तान क्रिकेट मंडळाला भरघोष नफा होऊ शकतो. आशिया चषकासाठी तरी पाकिस्तानच यजमान आहे. त्यामुळे आता तरी भारताने पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळायला यावे, असे पाकिस्तानला वाटत आहे. पण दुसरीकडे बीसीसीआय मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहे.