Inside Story : स्थायी समिती अध्यक्षपद निवडणुकीच्या निमित्ताने सेना-राष्ट्रवादीच्या ‘‘बालेकिल्ल्यात सुरुंग’’
अभिषेक बारणेंसह विविध समिती अध्यक्षपदाची संधी देताना रणनिती: प्रभाग 23- 24 मध्ये भाजपाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आता भाजपाचे नगरसेवक अभिषेक बारणे यांच्या हातात जाणार यावर शिक्कामोर्तब झाले. कारण, समिती सदस्यांमध्ये बहुमत सत्ताधारी भाजपाचे आहे. समिती अध्यक्षांच्या नियुक्तीमध्ये भाजपाने ‘‘पॉलिटिकल स्ट्रॅटजी’’ वापरली आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सुरूंग लावला आहे.
महापालिका निवडणुकीतील प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्रमांक 23 आणि 24 हा शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सोबत थेरगाव गावठाणसह प्रसुनधाम, गंगा आशियाना, कुणाल रेसिडेन्सी, स्विस कॉऊंटी, पडवळनगर भाग, पवार नगर, बापुजी बुवा नगर, जयमल्हार नगर भाग, बनगर बाबा मंदिर परिसर, अशोका सोसायटी, साईनाथनगर, समर्थ कॉलनी आणि प्रभाग क्र. 24 मधील अदित्य बिर्ला हॉस्पिटल, दत्तनगर, पद्मजी पेपरमिल, ग्रिन्स हाऊसींग सोसायटी, गंगा ओशियन मिडोज, पडवळनगर माग, गणेशनगर, म्हातोबानगर, प्रथम सोसायटी, क्रांतीनगर, महाराष्ट्र कॉलनी, यशदा कॉलनी, गुजरनगर, मंगलनगर, बेलठिकानगर भागात शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद भाजपापेक्षा तुलनेत तुल्यबळ आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 32 प्रभाग आहेत. यामध्ये प्रभाग 9, 14, 20, 22, 23, 24 आणि 30 या प्रभागांचा अपवाद वगळता अन्य 25 प्रभागांमध्ये भाजपाची ताकद प्रभावी आहे. त्यामुळे ज्या प्रभागात निवडणुकीत भाजपाची कामगिरी सक्षम राहीली नाही. त्या भागात महत्त्वाची पदे किंवा जास्तीची ताकद लावली जात आहे. क्रीडा समिती सभापती पदाचे उमेदवार कैलास कुटे (प्रभाग-14), शहर सुधारणा समिती सभापती पदाचे उमेदवार संजय काटे (प्रभाग- 30) यांच्या नियुक्तीचा विचार केला असता भाजपाची रणनिती स्पष्ट अधोरेखित होते.
प्रभाग 23 मधून भाजपाच्या तिकीटावर मनिषा पवार, तानाजी बारणे आणि अभिषेक बारणे निवडून आले आहेत. या प्रभागातून भाजपाच्या सोनाली गाडे यांचा पराभव झाला आणि राष्ट्रवादीच्या योगीता बारणे यांनी निवडणूक जिंकली आहे. प्रभाग क्रमांक 24 मध्ये भारतीय जनता पार्टीला एकही जागा मिळाली नाही. खासदार बारणे यांचे पुत्र विश्वजीत बारणे, पुतणे निलेश बारणे शिवसेना ‘‘धनुष्यबाण’’ चिन्हावर निवडून आले आहेत. राष्ट्रवादीच्या माया बारणे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे, तर अपक्ष निवडणूक लढवलेल्या शालिनी गुजर यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. परिणामी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या थेरगाव आणि परिसरात पक्षाची ताकद वाढण्याचा प्रयत्न स्थायी समिती अध्यक्ष नियुक्तीमध्ये भाजपा पक्षश्रेष्ठींनी केला आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
कोअर कमिटीकडून दोन नावांची शिफारस…
पिंपरी-चिंचवड महापालिकेत १२८ पैकी तब्बल ८४+१ नगरसेवकांचे बहुमत आहे. स्थायी समितीवर संधी मिळालेल्या सदस्यांमधून नगरसेवक संदीप कस्पटे आणि अभिषेक बारणे यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. पक्षाच्या कोअर कमिटीतील सात सदस्यांनी दोन नावे प्रदेश पक्षश्रेष्ठींकडे पाठवली. त्यापैकी अभिषेक बारणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. किंबहुना, भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी संदीप कस्पटे यांच्या नावाची शिफारस केली होती आणि आमदार शंकर जगताप यांनी अभिषेक बारणे यांच्या नावाची शिफारस केल्याचे बोलले जात आहे.
अभिषेक बारणे कोण आहेत?
थेरगाव येथील बारणे कुटुंबियातील अभिषेक बारणे यांचे वडील बजाज ऑटो कंपनीत होते. वडील उच्चशिक्षीत असल्यामुळे त्यांनी अभिषेक यांना वाकड येथील प्रतिथयश वुड्स अमेरिटन या कॉन्व्हेंट स्कूलमधून त्यांनी शिक्षण घेतले. घरामध्ये कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. त्यांनी २०१० मध्ये राजकीय क्षेत्रात करिअरला सुरूवात केली. ते उच्चशिक्षित असून, पेशाने सीव्हील इंजिनिअर आहेत. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी महापालिका निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा सुमारे ४०० मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर त्यांना दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी २०१७ मध्ये उमेदवारी दिली. त्यांना स्थायी समिती सदस्यपदी काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी थेरगाव हॉस्पिटल, बटरफ्लाय ब्रीज आणि अंतर्गत रस्ते आणि विकासकामांवर भर दिला. २०२६ मध्ये पुन्हा त्यांनी विजयी घोडदौड कायम ठेवली. अनुभवाच्या जोरावर त्यांना थेट स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे.
शत्रुघ्न काटे गटाला पुन्हा ‘‘वाटाण्याच्या अक्षदा’’?
स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी त्यांचे निकटवर्तीय असलेले संदीप कस्पटे यांचे नाव लावून धरले होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी अभिषेक बारणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यासाठी आमदार शंकर जगताप यांनी ‘राजकीय ताकद’ लावली, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यापूर्वी महापौरपदासाठी स्वत: शत्रुघ्न काटे तीव्र इच्छुक होते. त्यावेळीसुद्धा त्यांना संधी मिळाली नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार महेश लांडगे आणि आमदार शंकर जगताप असे भाजपामध्ये गट आहेत, असे मानले जाते. मात्र, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी स्वता:चा असा प्रभावी गट निर्माण केला आहे. नगरसेवक तिकट वाटपापासून विविध समितींवर महत्त्वाची पदे वाटप करताना काटे गटातील नगरसेवकांना डावलण्यात आले, असा संदेश राजकीय वर्तुळात गेला आहे.
भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षशिस्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. निवडून आलेल्या प्रत्येक नगरसेवकांना महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची महत्त्वाकांक्षा असते. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी कोअर कमिटीने पक्षश्रेष्ठींना शिफासर केली होती. त्यामध्ये पक्षश्रेष्ठींनी पक्ष संघटन आणि शहराच्या हिताचा विचार करुन निर्णय घेतला आहे. भाजपा एक परिवार आहे. गट-तट असे काही नाही. प्रत्येकजण आपआपल्या परीने पद मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असतो. पक्षश्रेष्ठींनी निर्देशीत केलेल्या नगरसेवकांसोबत अध्यक्षपदाचे अर्ज दाखल करण्यासाठी मी स्वत: उपस्थित होतो. नाराजी असण्याचे कारण नाही. पण, प्रत्येकाला न्याय देता येईल यासाठी प्रयत्नशील आहोत.
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.




