भोसरीत सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट यांच्या खांद्यावर महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा!
स्थानिक प्रभावशाली नेत्यांचा अभाव : अमोल कोल्हे म्हणतात... माझ्यासोबत सामान्य जनता
![In Bhosrit Sulabha Ubale, Dhananjay Alhat, the shoulder of Mahavikas Aghadi's campaign!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Kolhe-1-780x470.jpg)
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
शिरुर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रचारावर लक्ष केंद्रीत केले आहे. या मतदार संघातील शिवसेनेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे आणि माजी नगरसेवक धनंजय आल्हाट यांच्या मदतीने प्रचाराची ‘तालीम’ होताना दिसते.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून बुधवारी डॉ. कोल्हे यांनी रॅली काढली. त्यानंतर सभागृहात सभा घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे उपनेते सचिन आहेर असे दिग्गज पक्षश्रेष्ठी उपस्थित होते. मात्र, स्थानिक प्रभावशाली नेते, पदाधिकारी किंवा माजी नगरसेवक यांची उपस्थिती दिसली नाही.
महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत सुमारे २० वर्षे राजकीय क्षेत्रात सक्रीय असलेल्या सुलभा उबाळे यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत राहण्याची भूमिका घेतली. त्यानंतर आढळराव पाटील यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक धनंजय आल्हाट यांनीही कोल्हे यांच्या प्रचारात उडी घेतली आहे. या दोन स्थानिक नेत्याशिवाय भोसरीत कोल्हे यांच्या प्रचारासाठी तगडा चेहरा दिसत नाही. उबाळे आणि आल्हाट यांना आढळराव पाटील यांनी राजकीय ताकद दिली असतानाही, त्यांनी विरोधी उमेदवाराचा प्रचार करीत असल्यामुळे आढळराव समर्थकांत संताप व्यक्त होतो आहे.
तसेच, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे आणि युवकचे अध्यक्ष इम्रान शेख यांच्या कार्यकर्त्यांना भोसरीत प्रचार करावा लागतो. स्थानिक पातळीवर प्रभावी कार्यकर्ते नाहीत. त्यामुळे नाममात्र गर्दीवर प्रचार सभा घेण्यात येत असल्यामुळे नसल्यामुळे कोल्हे यांची भोसरीतील प्रचारासाठी दमछाक पहायला मिळत आहे.
उबाळे, आल्हाट विधानसभेसाठी तीव्र दावेदार…
राज्यातील बदलेल्या समीकरणानुसार, शिवसेना ठाकरे गट आणि पर्यायायाने महाविकास आघाडीकडून भोसरी विधानसभा मतदार संघाकडून निवडणूक लढण्यासाठी सुलभा उबाळे आणि धनंजय आल्हाट तीव्र दावेदार आहेत. त्यादृष्टीने आढळराव पाटील यांची साथ सोडून हे दोन्ही स्थानिक नेते महाविकास आघाडीसोबत मैदानात उतरले आहेत. कोल्हे यांच्या निवडणुकीत प्रभावीपणे काम करून भोसरी मतदार संघावरील दावा निश्चित करण्यासाठी ठाकरे गटाकडून उबाळे आणि आल्हाट पूर्ण ताकदीने काम करीत आहेत. त्यामुळे कोल्हे यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने भोसरीत ठाकरे गट प्रभावशाली झाला असून, उबाळे आणि आल्हाट विधानसभेचे दावेदार मानले जात आहेत.
विलास लांडे समर्थक कोल्हेंच्या प्रचारात…
भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राष्ट्रवादीचे वसंत लोंढे, लांडे यांचे समर्थक माजी स्थायी समिती सभापती सुरेखा लोंढे या कोल्हे यांच्या प्रचारात सक्रीय आहेत. तसेच, लांडे समर्थक नितीन सस्ते आणि ज्ञानेश्वर बोऱ्हाडे यांच्यासारखे कार्यकर्ते कोल्हे यांच्या प्रचारात पहायला मिळत आहे. या व्यतिरिक्त भोसरीत कोल्हे यांना स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही.