‘भाजप अजुन किती झुकणार’; केजरीवालांच्या अटकेनंतर शरद पवारांचा निशाणा

मुंबई : लोकसभा निवडणुकीआधी आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. याआधी मुख्यमंत्री केजरीवाल यांना तब्बल नऊ वेळा ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. आज ईडीचे पथक त्यांच्या घरी पोहोचले आणि काही वेळाने त्यांना अटक करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर देशभरातून केंद्र सरकार आणि भाजपवर विरोधकांनी टीका केली आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.
निवडणुका तोंडावर आल्याने विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी सुरू असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा तीव्र निषेध. भाजप सत्तेसाठी अजुन किती खाली झुकणार हे या अटकेवरून दिसून येतं. अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातील कारवाईविरोधात इंडिया आघाडी एकजुटीने उभी आहे, शरद पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दोन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दिल्ली दारू घोटाळ्यात ही अटक झाली आहे. या प्रकरणातील ही १६ वी अटक आहे. ईडीची टीम संध्याकाळी सात वाजता अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचली होती. आता त्यांना अटक करण्यात आली असून त्यांचा आजता मुक्काम ईडी कार्यालयात असणार आहे.
दिल्ली सरकारने २०२१-२२ साली दारुविक्रीबाबत एक नवीन धोरण बनवलं होतं. सरकारी महामंडळांऐवजी दारु विक्रीचे अधिकार खासगी वितरकांना देण्यात आले होते. दिल्लीतल्या एकूण १६ विक्रेत्यांना दारु वितरणाची जबाबदारी दिली. केजरीवाल सरकारने म्हटलं की, नव्या धोरणाने दारुचा काळाबाजार थांबला. नव्या धोरणामुळे दिल्ली सरकारच्या महसुलात मोठी वाढही झाली. मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांचा आहे. याच प्रकरणा आपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तुरूंगात आहेत.





