Historical announcement: शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत!
महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब: रायगड, राजगड, शिवनेरी प्रतापगड, पन्हाळ्याचा समावेश

मुंबई : महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बातमी असून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, प्रतापगड, पन्हाळ्यासह 11 किल्ले आहेत तर तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सध्या भारतातील 42 वारसा स्थळांचा समावेश आहे. त्यापैकी अजिंठा लेणी, वेरुळची लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई व्हिक्टोरियन अँड आर्ट डेको एन्सेबल आणि एलिफंटा केव्ह्ज या पाच स्थळांचा या आधीच समावेश होता. त्यामध्ये आता मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश आहे.
रायगड, प्रतापगड, राजगड, पन्हाळ्यासह राज्यातील 11 किल्ले आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण 12 किल्ल्यांचा समावेश आहे. या किल्ल्यांचा समावेश व्हावा म्हणून गेल्या वर्षी भारत सरकारने युनेस्कोकडे मागणी केली होती.
जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेले हे सर्व किल्ले सतराव्या शतकात बांधले गेलेले आहेत. हे किल्ले मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा आणि अभेद्य तटबंदीचा भक्कम पुरावा आहेत.
कोणत्या किल्ल्यांचा जागतिक यादीत समावेश
-
- रायगड Raigad
- राजगड Rajgad
- प्रतापगड Pratapgad
- पन्हाळा Panhala
- शिवनेरी Shivneri
- लोहगड Lohgad
- साल्हेर Salher
- सिंधुदुर्ग Sindhudurg
- विजयदुर्ग Vijaydurg
- सुवर्णदुर्ग Suvarnadurg
- खांदेरी Khanderi
- जिंजी Gingee Fort
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी युनेस्कोच्या या निर्णयाची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांची युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची गोष्ट ही महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. यासाठी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष प्रयत्न केल्याचं म्हटलं. तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे यासाठी सहकार्य लाभल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.