चौकटी बाहेरची काँग्रेस, काँग्रेसचा ‘चौकट राजा’!

भारतावर वर्षानुवर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसला अर्थात् नेहमीच नेहरू-गांधी घराण्यावर भिस्त ठेवून चालणाऱ्या काँग्रेस पक्षाला नक्की काय झालं आहे, हे समजत नाही.. प्रत्येक निवडणुकीत हल्ली सपाटून मार खाणे, विरोधकांनी उखडून फेकून देणे हे आता नित्याचेच झाले आहे. विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतपतही जागा जिंकणे त्यांच्या नशिबात दिसत नाही.
उभारी घेण्याची मानसिकता संपली
निवडणूक हरली की त्याचे चिंतन न करता, नव्या जोमाने पक्ष बांधणी न करता केवळ रडत बसणे.. कुरापती काढणे आणि ईव्हीएम वर खापर फोडणे, एवढाच धंदा त्यांच्याकडे उरला आहे. काँग्रेसची अधिवेशने किंवा कार्यकर्त्यांना ताकद देणारी भाषणे आता लोपली आहेत, हे प्रथम मान्य करायला हवे!
तळागाळापासून लोकसभेपर्यंत सुपडा साफ होत चाललेल्या काँग्रेसपुढे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या पलीकडे नेतृत्व दिसत नाही. मृतवत् झालेला हा पक्ष व्हेन्टीलेटरवर आहे आणि शेवटच्या घटका मोजत आहे, हे दुर्दैवाने म्हणण्याची वेळ आली आहे.
राहुल गांधी यांची धडपड अपुरी
म्हणूनच, सध्याच्या अत्यंत वेगवान राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे अभिनंदन करणे गरजेचे आहे. आपल्या विचारधारा पुन्हा पुन्हा तपासून पाहणे, हाही वेगवान राजकीय घडामोडीतील महत्त्वाचा टप्पा आहे. या सगळ्याचा विचार करता राहुल गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि सर्वच काँग्रेसजनांना , ‘चौकटी बाहेर विचार करा’, असा संदेश दिला आहे. साहजिकच या संदेशाचे स्वागत करणे अगत्याचे आहे. अत्यंत विद्वान, विचारी, संवेदनशील, राष्ट्राभिमानी अशा व्यक्तींनी काँग्रेस पक्ष वाढवण्यात आणि तो जनतेच्या मनात रुजवण्यात अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. एक काळ काँग्रेस ही चळवळ न राहता भारतीयांचा श्वास झाली होती. आज काँग्रेस पक्ष व्हेंटिलेटरवर असल्याच्या अवस्थेत आहे. काँग्रेसलाच कृत्रिम श्वास देण्याची वेळ आलेली आहे, असे म्हणणे दुर्दैवीपणाचे ठरेल!
हेही वाचा – अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त वाहतूक बदल; बाणेर, बालेवाडी भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने
राहुल गांधी यांनी काय करावे?
राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षामध्ये म्हणजेच काँग्रेसच्या विचारधारेत तेज आणायचे असेल, सत्व निर्माण करायचे असेल तर चौकट बंद विचार, कृतीच्या पलीकडे जाऊन काम केले पाहिजे. अर्थात् हे काम कोणी करायचे ? चौकटी बाहेरचे विचार कोण देणार ? ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसे पोहचवणार? ते पोहचवत असताना ते तसेच शुद्ध राहतील, त्यात भेसळ होणार नाही,याची हमी कोण घेणार? ते व्यक्तीकेंद्रित न राहता पक्षकेंद्रीत व्हावे, यासाठी काय आणि कोणते नियोजन आहे? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होतील.
राहुल गांधी यांनी या प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे. अर्थात् ही उत्तरे जाहीरपणे देणे योग्य नाही, किंबहुना पक्षवाढीच्या रणनीतीच्या दृष्टीने ते गोपनीय राहणे अधिक श्रेयस्कर आहे. मात्र, कालबद्ध लक्ष्य ठेवून काँग्रेसजनांमध्ये तशी कृती किंवा वर्तन दिसणे आवश्यक आहे.
गेल्या दहा वर्षात काँग्रेसच्या यशाअपयशाचा आलेख चढउताराचा आहे. जिथे यश मिळाले, तिथेही ढिसाळ नियोजन आणि निर्णय शून्यतेमुळे अपयशाला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत काँग्रेसची परंपरा काँग्रेसचे संस्थान आणि त्यातील संस्थानिक यांनी स्वतःला पहिल्यांदा चौकटीतून बाहेर काढले पाहिजे. सर्वसामान्यांच्या मध्यमवर्गीयांच्या दृष्टीने काँग्रेस आपलीशी वाटावी, या पद्धतीने काँग्रेसने सामाजिक नियोजन केले पाहिजे.
चिखलफेकी पलीकडील राजकारण
राजकारण करत असताना केवळ टीका टिप्पणी आणि एकमेकांवर चिखलफेक या पलीकडे बरेच काही देता येण्यासारखे आहे. कार्यकर्ता तयार करणे, नेत्यांची फळी तयार करणे, यासारख्या बाबींकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. एकेकाळी काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष होता. आज काँग्रेससह सर्वच पक्ष अपवाद वगळता पंचतारांकित व्यवस्थापनाचे पक्ष झाले आहेत. यातून काँग्रेसलाही बाहेर पडले पाहिजे. केवळ जातीपातीचा विचार करून निवड, नियुक्ती आणि उमेदवारी देण्यामुळे जनता, मतदार आपल्याबरोबर येतील हा भ्रम आहे. या भ्रमातूनही काँग्रेसने लवकरात लवकर बाहेर पडले पाहिजे. अर्थात् राहुल गांधी यांच्यापुढे यासंदर्भात नियोजन असेल, किंबहुना त्यांनी ते करावे. एक विचार तरी त्यांनी मांडला आहे. हा विचार पृथ्वीराज चव्हाण आणि सुमारे पंचवीस जणांनी काही महिन्यांपूर्वी मांडला होता. त्यावेळी ही मंडळी राहुल गांधी आणि गांधी परिवाराच्या काळ्या यादीत गेली होती. सातारा जिल्ह्यात पृथ्वीराज चव्हाण हे त्याचे ढळढळीत उदाहरण आहे. थोडक्यात जुन्या नव्याचा संगम म्हणजेच अनुभव आणि उत्तम क्षमता, ताकद याचा मिलाफ करणे हे मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका वड्रा आणि काँग्रेसच्या सुकाणू समिती पुढचे आव्हान आहे.
घराणेशाही झटकून टाका..
परिवारवाद ,घराणेशाहीचा अदृश्य प्रभाव कार्यकर्त्यांनी झटकून टाकला पाहिजे, तरच चौकटीबाहेरचा विचार व्यापक होईल. थोडक्यात ‘ब्रेक द रुल फॉलो द प्रिन्सिपल्स’ या वाक्याला केंद्रस्थानी ठेवून काम करणे गरजेचे आहे. अन्यथा, चौकटी पलीकडे ठराविक मंडळींची चौकट आखून काम केले जाईल आणि चौकटी पलीकडची चौकट एकसारखीच आहे हे कालांतराने सिद्ध होईल !
बुंध्यावर घाव, फांद्या आपोआप पडतील
काँग्रेसला ‘डॅमेज’ करा, विजय आपोआप मिळेल, असे धोरण भारतीय जनता पार्टीने आखले असून त्या दृष्टीने त्यांचे हल्ले सुरू असतात. मुख्य म्हणजे सोनिया गांधी या कुचकामी आणि राहुल गांधी म्हणजे ‘पप्पू’ हे बिंबवण्यात भाजपला कमालीचे यश आले आहे. राहुल गांधी काहीही बोलले, तर त्यांची टर उडवली जाते. त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही. थोडक्यात भाजपाने राहुल गांधी यांची ‘चौकटचा राजा’ म्हणजे काहीही समजण्यापलीकडचा नेता अशी प्रतिमा करून ठेवली आहे, ती प्रथम सुधारणे महत्त्वाचे आहे!