श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Untitled-design-9-2-780x470.jpg)
नाशिक : हेमंत गोडसेंच्या नावाची श्रीकांत शिंदेंनी घोषणा करताच गोडसे समर्थकांकडून रात्री उशिरापर्यंत जल्लोष साजरा करण्यात आला. जोरदार घोषणाबाजी करत पुष्पगुच्छ देत गोडसेंचा सत्कार करण्यात आला, त्यांना शुभेच्छा देण्यात आल्यात. सोबतच आता कामाला लागा अशा सूचना देखील कार्यकर्त्यांना देण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यावर पहिली प्रतिक्रिया देतांना हेमंत गोडसे म्हणाले की, “खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेब काम करतायत, मी पण विकासकामे, संघटना बांधणीसाठी मेहनत घेतली आणि हिच परिस्थिती लक्षात घेता त्यांनी ही जागा धनुष्यबाणाला राहील अशी घोषणा केली. मला असं वाटतय की सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लोकाभिमुख कामे करतायत. मोदी साहेबांच ही खंबीर नेतृत्व मिळालय. ३७०, राम मंदिर असे धाडसी निर्णय घेतले आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवारच निवडून येईल, असे गोडसे म्हणाले.
एकीकडे नाशिक लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असतांनाच, मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल सायंकाळी नाशिकमध्ये आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणाच करून टाकली. त्यांची हीच घोषणा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतेय. त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादीची यावर भूमिका काय? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. गेल्या दहा वर्षात मी केलेली विकासकामे आणि संघटना बांधणी बघता मला पुन्हा ही संधी देण्यात आली असून, विजयाची हॅटट्रिक होणार की नाही? हे नाशिकची जनता ठरवेल. माझी उमेदवारी घोषित झाल्याने कोणाला नाराज होण्याचे कारण नाही, असा टोलाही त्यांनी महायुतीतील इतर इच्छुक उमेदवारांना लगावलाय.
हेही वाचा – बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा भाजपाविरोधात शड्डू ठोकला; म्हणाले..
स्वामी शांतिगिरी महाराजांनी यांनी देखील नाशिक लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. महायुतीकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरु आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती. तर, शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीसाठी भाजपमधील काही नेते देखील आग्रही आहेत. असे असतांना श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्याने शांतिगिरी महाराजांचे काय होणार अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे उमेदवारी न मिळाल्यास शांतिगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची देखील चर्चा आहे.
मला विश्वास आहे की, १८ शिवसेनेचे खासदार धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेत आणि त्या पुन्हा द्यावेत अशी मागणी आमची मुख्यमंत्र्यांकडे आहे. अडचणींचा काही भाग नाही, वरिष्ठ निर्णय घेत असतात. कोणी नाराज होण्याची गरज नाही. प्रत्येकजण उमेदवारीसाठी स्पर्धा करत असतो आणि प्रत्येकाला तिकीट देणे शक्य नसते. नाशिक लोकसभा मतदारसंघात १० टक्के फक्त माझा दौरा बाकी, दोन दिवसात पूर्ण होईल. अधिक बांधणीवर जोर असेल. तसेच हॅटट्रिक होणार का? हे नाशिकची जनता ठरवेल, असे हेमंत गोडसे म्हणाले.