‘सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग’; हर्षवर्धन पाटलांची मोठी कबुली
![Harshvardhan Patil said that our invisible participation in the victory of Supriya Sule](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Harshvardhan-Patil-and-Supriya-Sule-780x470.jpg)
Harshvardhan Patil | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार) उमेदवार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या (अजित पवार) सुनेत्रा पवार यांचा तब्बल १ लाख ५३ हजार मतांनी पराभव केला. या निवडणुकीवेळी हर्षवर्धन पाटील भाजपात होते आणि आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशावेळी हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग असल्याची कबुली दिली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, जयंतराव आपण १५ वर्षे एकत्र काम केलं आहे. आज तुम्ही या पक्षाचे अध्यक्ष आहात आणि मला तुम्ही या पक्षात सहभागी करून घेतलं. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. खासदार सुप्रिया सुळे या आमच्या भगिनी आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे सुप्रिया सुळे चार वेळा खासदार झाल्या आहेत. आधी तीन वेळा जेव्हा त्या खासदार झाल्या, त्यावेळी त्यांच्या विजयात थोडंफार का होईना, आमचंही प्रत्यक्ष योगदान होतं. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विजयात आमचा अदृश्य हात होता.
हेही वाचा – ‘मी कमिशन घेत नाही, कामात कसूर केल्यास..’; नितीन गडकरींचा कंत्राटदारांना इशारा
मी या पक्षात प्रवेश करण्यापूर्वी माझी आणि जयंत पाटील यांची जेव्हा जेव्हा भेट व्हायची, आमचं भेटणं किंवा बोलणं व्हायचं, आम्ही फोनवर बोलायचो तेव्हा जयंत पाटील मला म्हणायचे, तिकडे का थांबला आहात, त्याऐवजी इकडे या. कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो. त्यानुसार आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये (शरद पवार) आलो आहे, असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले.