ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर कडाडून टीका केली
ठाकरे गटाचे नेते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा
![Group, Chief, Uddhav Thackeray, Shiv Sena, Shinde, Criticism, Leader, Entry,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/shivsena-780x470.jpg)
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदेच्या शिवसेनेकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. मात्र आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर कडाडून टीका केली आहे. ‘ काजवा तरी स्वयंप्रकाशित असतो, मिध्यांना टॉर्च मारावी लागते’ अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली. दिल्लीतून टॉर्च बंद झाल्यानंतर मिंधे कुठे जातील कळत नाही, काळोखात काय चेंगराचेंगरी होईल, कळणारही नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला.
गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरच्या चर्चा रंगत असून ठाकरे गटाचे नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. तिकडे फक्त संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेच उरतील असे म्हणत शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनीही काल ठाकरे गटावर टीकास्त्र सोडलं होतं. तर एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. वाघाचं कातडं कोणी पांघरलं तर तो वाघ होत नाही. त्यासाठी त्याच्याकडे वाघाचं काळीज असायला हवं. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्या वर्षा निवासस्थानाचे दरवाजे सर्वांसाठी खुले होते. आज देखील माझे दरवाजे सर्वांसाठी उघडे आहेत. हे फक्त एक ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं होतं.
हेही वाचा : कर्जाचा EMI कमी होणार! RBI कडून रेपोदरात कपात
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
मात्र यामुळे संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. ” अरे काजवा जरी एवढासा असला तरी तो स्वयंप्रकाशित असतो. पण ह्यांच्यावर ( शिंदे गट) जोपर्यंत तिकडून टॉर्च मारला जातोय तोपर्यंत दिसंतय. दिल्लीतून टॉर्च बंद झाला की अंधारात कुठे जातील कळत नाही. मग त्यांच्याबरोबर जे गेले आहेत, तिथे काळोखात काय चेंगराचेंगरी होईल काहीच कळणार नाही. यांचं भवितव्य फार बिकट आहे ” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं.
‘जर तुम्ही खऱी मर्दांची औलाद असाल तर ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स आणि पोलिसांना बाजुला ठेऊन आमच्यासोबत लढा’ आम्ही तुम्हाला दाखवून देऊ खरी शिवेसना कोणाची आहे ते’ असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.