breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

Ground Report: पिंपरी-चिंचवडमध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ‘निष्प्रभ’

पिंपरी, चिंचवड आणि भोसरीतही प्रभाव दाखवता आला नाही : स्थानिक दिग्गजांची राजकीय ‘स्पेस’ भरुन काढण्याची संधी हुकली

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरात ‘प्रभाव’ दाखवण्याची संधी असतानाही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक नेते ‘निष्प्रभ’ दिसले. त्यामुळे आगामी काळात शहरात राष्ट्रवादीला अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

‘‘उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड’’ हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ‘बालेकिल्ला’ म्हणून ओळखला जात होता. अजित पवार यांच्या राजकारणातील एन्ट्रीने या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने निर्विवाद सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून २०१७ पर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात होती.

मधल्या काळात दिवंगत लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये प्रवेश केला. २०१४ मध्ये जगताप यांनी चिंचवडमध्ये ‘कमळ’ फुलवले. पिंपरीतून ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी ‘धनुष्यबाण’ चिन्हावर विजय मिळवला आणि राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडे यांना पराभव दाखवला. भोसरीतून महेश लांडगे यांनी माजी आमदार विलास लांडे यांना पराभूत केले. २०१७ मध्ये जगताप आणि लांडगे जोडीने महापालिकेवर वर्चस्व मिळवले. २०१९ मध्ये पिंपरी विधानसभेत अण्णा बनसोडे यांच्या रुपाने राष्ट्रवादीला अस्तित्व टिकवता आले. त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा उभारी घेईल, अशी अपेक्षा होती.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. त्यावेळी संधी असतानाही पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला बस्तान बसवता आले नाही. भाजपातून दोन-तीन पक्षप्रवेश वगळता राष्ट्रवादीची कामगिरी सुमार राहिली. राज्यात शिंदे गटाने शिवसेना फोडली आणि महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर भाजपा पुन्हा सत्तेत विराजमान झाले. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या राष्ट्रवादीला पुन्हा ग्रहण लागले.

राष्ट्रवादीतून बाहेर पडत अजित पवार यांनी ‘महायुती’मध्ये सहभागी भूमिका घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी उभी फूट पडली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला स्थानिक नेतृत्त्वच मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, भाजपाचे माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी शहराध्यक्षपदाची धुरा स्विकारली आणि अजित पवार गटाला आव्हान दिले. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपली ताकद दाखवण्याची संधी असतानाही राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी सावध भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादीचा प्रभाव या निवडणुकीत दिसला नाही. त्यामुळे शहराच्या राजकारणात बलाढ्य राहिलेली राष्ट्रवादी आता नाममात्र उरते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.

ना सभा… ना लक्षवेधी प्रचार… केवळ सोपस्कार…!

मावळातून महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्या प्रचारात शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सक्रीय सहभाग दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बूथयंत्रणा आणि निवडणूक व्यवस्थापनामध्ये सहभाग दिसला नाही. तसेच, महायुतीचे श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे दोनदा सोशल मीडियावर झळकले. मात्र, प्रत्यक्ष प्रचारात त्यांचा सहभाग नगण्य होता. शिरुर लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी भोसरीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून ना सभा झाली ना लक्षवेधी प्रचार झाला. महायुती आणि महाविकास आघाडीत तोडीस-तोड ताकद असतानाही राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा ‘परफॉर्मन्स’ सुमार राहिला. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीनही मतदार संघामध्ये अजित पवार यांची एक सभा वगळता राष्ट्रवादीला प्रभाव दाखवता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

आमदार महेश लांडगेंसमोर राष्ट्रवादी ‘सरेंडर’

मावळमध्ये महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या उमेदवाराकडे कोणत्याही राष्ट्रवादीचे चिन्ह नव्हते. पण, शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढाई होती. ही लढाई दोन्ही पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांकडून प्रतिष्ठेची करण्यात आली. पण, भोसरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्यासमोर ‘सरेंडर’ केले, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे. गेल्या दोन महिन्यांच्या काळात पक्षाच्या चिन्हावर उमेदवार रिंगणात असताना राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्यांची एकही सभा या मतदार संघात झाली नाही. दोन्ही गटांकडून वर्चस्वाची लढाई किंवा प्रचारातील चढाओढ दिसली नाही. किंबहुना, भाजपा आणि महेश लांडगे यांच्या समोर दोन्ही राष्ट्रवादी निष्प्रभ ठरलेल्या आहेत. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्यासह स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांना ऑन फिल्ड किंवा सोशल मीडियावरसुद्धा उमेदवार कोल्हे किंवा आढळराव पाटील यांच्यासाठी प्रभावीपणे ‘परफार्मन्स’ देता आला नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button