देशातील टॉप १० खासदारांच्या यादीत महाराष्ट्रातील चार खासदार
सुप्रिया सुळे पहिल्या, तर श्रीरंग बारणे दुसऱ्या स्थानी
मुंबई : सतराव्या लोकसभेत आतापर्यंत कामगिरीनुसार बारामतीच्या राष्ट्रावादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे पहिल्या नंबरवर आहेत. तर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
‘गेट वे पॉलिटिकल स्टॅटेजिक’ संस्थेमार्फत १७ व्या लोकसभेत सक्रिय सहभाग घेणाऱ्या खासदारांच्या कामाचे विश्लेषण केले गेले. या संस्थेने जारी केलेल्या खासदारांच्या यादीत देशातील टॉप-टेन खासदारांमध्ये महाराष्ट्रातील चार खासदारांना स्थान मिळाले आहे. यात बारामती लोकसभेच्या सुप्रिया सुळे या पहिल्या तर मावळचे श्रीरंग बारणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आठव्या तर राहुल शेवाळे हे नवव्या क्रमांकावर आहेत.
यासोबतच, तमिळनाडूतील खासदार सेंथीलकुमार एस आणि धनुष एम. कुमार, राजस्थानचे खासदार पी.पी. चौधरी, उत्तरप्रदेशचे खासदार पुष्पेंद्रसिंह चंदेल, अंदमान आणि निकोबारचे खासदार कुलदीप राय शर्मा, झारखंडचे खासदार विद्युत बरन महतो यांचा देखील या यादीत समावेश आहे.
लोकसभेच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे गेट वे पॉलिटिकल स्टॅटेजिक संस्थेमार्फत सतराव्या लोकसभेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या सत्रपर्यंतच्या देशातील खासदारांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले, त्यानुसार कामकाजात सक्रिय सहभागी होणाऱ्या टॉप-टेन खासदारांची यादी बनविण्यात आली. १४८ वेळा चर्चेत सहभाग घेत खासदार श्रीरंग बारणे यांनी ५०८ प्रश्न विचारले आहेत. दहा टक्के खासगी विधेयकेही मांडली आहेत. सभागृहात त्यांची उपस्थिती ९४ टक्के आहे.