FACT CHECK : संभाजी महाराज पुतळा प्रकरणात आता ‘नोटीस ड्रामा’
‘‘महानगरपालिका आयुक्त तोंडघशी पडले’’ वृत्तांमध्ये तथ्य आहे का? : महाराजांच्या पुतळ्यावरुन राजकीय षडयंत्राचा आणखी एक प्रयत्न फसला

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
धर्मवीर संभाजी महाराज पुतळा प्रकरणात ‘पॉलिटिकल मायलेज’ मिळत नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर महाविकास आघाडीचे ‘बॅनर’ पुढे करुन ‘‘आय एम अलवेज राईट’’ अशी भूमिका घेणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांचा आणखी एक प्रयत्न फसला आहे.
‘‘छत्रपतींच्या पुतळ्याच्या अवशेषाला तडा गेला, कार्यकारी अभियंत्याची कबुली, महानगरपालिका आयुक्त तोंडघशी पडले, प्रशासनाने हात झटकले, पुतळा उभारणीमध्ये हलगर्जीपणा झाला. संबंधित ठेकेदार आणि सल्लागाराला नोटीस बजावली, प्रशासनाने माहिती दडवली.. लपवाछपवी ’’ अशा आशयाचे वृत्त शहरातील आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. विशेष म्हणजे, महानगरपालिका कार्यकारी अभियंता श्री. देवन्ना गट्टुवार यांच्या प्रतिक्रियेसह खणखणीत बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांच्या मनात संशय निर्माण झाला.

याबाबत पिंपरी-चिंचवडमधील शिव-शंभूप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांना खरी वस्तुस्थिती ज्ञात व्हावी. या करिता ‘महाईन्यूज’च्या माध्यमातून आम्ही FACT CHECK केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकृत माहितीनुसार,
1.छत्रपती संभाजी महाराज पुतळा मोजडीला कथित तडा गेल्या प्रकरणी महानगरपालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदार आणि सल्लागार यांना कोणतीही नोटीस बजावलेली नाही.
2. कार्यकारी अभियंता श्री. देवन्ना गट्टुवार यांनी पुतळ्याला तडा गेल्याबाबत पत्रकार प्रतिनिधींकडे कबुली प्रतिक्रिया दिली आहे, या वृत्तामध्येही तथ्य नाही.
3. आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये केवळ शब्द फिरवून एकाच आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यामध्ये पुतळ्याला तडा गेल्याचे म्हटले आहे. यामध्येसुद्धा तथ्य नाही. पुतळ्याचे काम सध्या Fabrication stage मध्ये आहे.
4. महानगरपालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला पत्राद्वारे ‘‘ दि.३० ऑगस्ट २०२४ रोजी काही व्यक्तींनी पुतळ्याच्या काही भागाचे फोटो व्हायरल करुन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी यापुढे असल्या घटना घडू नयेत यासाठी आपणामार्फत पुतळ्याचे भाग साईटवर सुस्थितीत तसेच आच्छादित करुन ठेवणेत यावेत. तसेच, संपूर्ण परिसर बंदिस्त करुन इकडिल विभागाचे परवानगी शिवाय कोणासही प्रवेश देणेत येवू नये. ’’ असे कळवले आहे. याला कायदेशीर भाषेत नोटीस म्हणत नाहीत.

वरील सर्व बाबींचा विचार केला असता, शहरातील काही पत्रकार सहकाऱ्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असावी. त्यामुळे अपूर्ण माहितीच्या आधारे वृत्त प्रसिद्ध केल्याचे लक्षात येते. किंबहुना, इतक्या संवेदनशील विषयाबाबत वृत्तांकनाला प्रसिद्धी निश्चित करताना वरिष्ठांनीही वृत्ताबाबत शहानिशा केल्याचे दिसत नाही. मालवण येथील पुतळा प्रकरणामध्ये राज्यभरात जनक्षोभ निर्माण झाला. त्याची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवडमध्ये होवू नये. या करिता समाजाचा ‘आरसा’ असलेल्या पत्रकार, प्रसारमाध्यमकर्मींनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.
महापालिका अधिकारी दबावाखाली… ?
वास्तविक, दि.३० ऑगस्ट रोजी एक वृत्त प्रसारमाध्यमांत प्रसिद्धीस आले. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून महापालिका आयुक्तांनी लगेच सायंकाळी प्रसिद्धी पत्रक काढले आणि व्हीडिओद्वारे पिंपरी-चिंचवडकरांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, ‘‘चुकीच्या बातमीवर विश्वास ठेवू नका’’ असे आवाहनही केले. पुतळ्याच्या उभारणीबाबत भारतीय सनदी सेवेतील अधिकारी (IAS) आणि B.Tech(Civil Engg) M.Tech(Structural Engg) असे उच्चविद्याविभूषित असलेले शहराचे प्रशासकीय प्रमुख शेखर सिंह यांच्यावर भाजपाचे प्रवक्ते आहेत का? असा आरोप तुषार कामठे यांनी उपस्थित केला होता. दुसरीकडे, महापालिकेतील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर माहितीसाठी दबाव टाकला जात आहे. त्यासाठी काही स्थानिक नेते फोन करीत आहेत. किंबहुना, महाविकास आघाडीतील बड्या नेत्याचा निरोप आहे माहिती द्या… असा दबाव महापालिकेत निर्माण केला जात आहे, अशी चर्चाही महानगरपालिका वर्तुळात ऐकायला मिळते. मात्र, याबाबतच्या तथ्याबाबत ‘महाईन्यूज’ कोणतीही पुष्टी करत नाही.






