सुषमा अंधारेंना मारहाण केल्यादा दावा करणाऱ्या आप्पासाहेब जाधवांची हकालपट्टी
मुंबई : आज बीडमध्ये ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा होणार आहे. या यात्रेमध्ये संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र या सभेपूर्वीच ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काल सुषमा अंधारे सभा स्थळाची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यासह सुषमा अंधारे यांचा वाद झाला. यानंतर आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले. याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी मोठी कारवाई केली आहे.
जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर जिल्हासंपर्क प्रमुख धोंडू पाटील यांचीही ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या दोन्ही जिल्हाप्रमुखांवर पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली आहे.
हेही वाचा – बाबाराजे देशमुखवर ७० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल
जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
सुषमाताई अंधारे सध्या जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या पैसे मागत आहेत. आपल्या कार्यालयात एसी, फर्निचर आणि सोफा बसवण्यासाठी त्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेत आहेत. त्या माझंही पद विकत आहेत. मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे. रक्तांचं पाणी करत आहे. माझ्या लेकरा-बाळाच्या मुखातील पैसे खर्च करून मी पक्ष वाढवत आहे. याकडे सुषमा अंधारेंचं लक्ष नाही. त्यामुळे सुषमा अंधारेंचा आणि माझा वाद झाला. या वादात मी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या, असे गंभीर आरोप आप्पासाहेब जाधव यांनी केला आहे.