#ElectionsResults। कोणतेही अपयश अंतिम नाही; विधानसभेच्या कामाला लागा : उपमुख्यमंत्री अजित पवार
निवडणुकीतील पराभवाचे चित्र बदलण्याचा केला संकल्प: पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् ‘एनडीए’च्या कामगिरीचेही अभिनंदन
![#ElectionsResults. No failure is final; Deputy Chief Minister Ajit Pawar started working in the Legislative Assembly](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Ajit-Pawar-1-780x470.jpg)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलंही अपयश अंतिम नसतं. अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं, उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण केलं जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला राज्यातील ५ पैकी ४ जागांवर पराभव स्विकारावा लागला आहे. तसेच, अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या बारामती मतदार संघातही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात मोठी शांतता आहे.
अजित पवार म्हणाले की, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीला मतदान केलेल्या समस्त मतदार बंधु-भगिनींचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. प्रधानमंत्री मा.श्री. @narendramodi
साहेबांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’नं बहुमताचा टप्पा गाठला, त्याबद्दल प्रधानमंत्री महोदयांचं आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो. ‘एनडीए’च्या विजयासाठी गेले काही महिने सातत्यानं परिश्रम घेतलेले सर्व नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार बंधू-भगिनी सर्वांना धन्यवाद देतो.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. @SunilTatkare हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आहेत. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अरुणाचल विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार निवडून आले आहेत. पक्षासाठी हे अभिमानास्पद यश आहे. पक्षाच्या या विजयी उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन करतो. देशात लवकरंच सलग तिसऱ्यांदा स्थापन होणारं ‘एनडीए’चं सरकार जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यात, देशाला महाशक्ती बनवण्यात यशस्वी होईल, याची खात्री आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.