अहिल्यानगर जिल्ह्यातील ८६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर

अहिल्यानगर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता मार्गी लागलेल्या असल्या तरी त्या मुळातच विविध कारणांनी लांबल्या होत्या, यामुळे जिल्ह्यातील मुदत संपणार्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही आता लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्वीच्या ९९ आणि यंदाच्या वर्षात संपणाऱ्या ७६७ अशा ८६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतरच म्हणजे दिवाळीनंतर होण्याची शक्यता प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील २०२५-२५ मध्ये मुदत संपलेल्या ९९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आधी लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडल्या. सध्या येथे प्रशासकामार्फत कारभार सुरू आहे. आता पुढील महिन्यांत ७६७ ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत संपणार आहे. तेथे निर्धारित वेळेत नवे सदस्य निवडून येण्यासाठी डिसेंबर महिन्यातच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. परंतू आधी नगरपालिकांची प्रक्रिया आणि त्यानंतर लांबलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूका यामुळे जिल्ह्यातील ८६६ ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी दिवाळीनंतर प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे
दरम्यान मुदत संपणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियपूर्वी त्या-त्या ग्रामपंचायतींचा प्रभाग रचना कार्यक्रम तयार करून तो प्रसिध्द करून त्यावर हरकती, सुनावणी घेवून तो अंतिम करून प्रसिध्द करावा लागतो. यासाठी साधारणपणे एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागतो. जिल्ह्यात अजून जिल्हा परिषदांच्या निवडणूका होणे बाकी आहेत. त्या निवडणूक उन्हाळ्यात झाल्यास त्यानंतर पावसाळ्यात कोणत्याच निवडणूका होत नाहीत. जिल्ह्यातील पावसाळा साधारण दिवाळीच्या दरम्यान संपतो. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक तयारीसाठी महिना-दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने जिल्ह्यातील ८६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका दिवाळीनंतरच शक्यता व्यक्त होत आहे.
हेही वाचा –भाषण सुरू असताना कार्यकर्त्याने दिली चिठ्ठी, अजित पवारांच्या उत्तरानंतर सभेत एकच हशा
जानेवारी ते डिसेंबर २०२४ मध्ये मुदत संपलेल्या ८४ ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना व मतदार याद्यांचा कार्यक्रम पूर्ण झाला होता. तसेच जानेवारी ते डिसेंबर २०२५ मधील मुदत संपलेल्या १४ ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यामुळे या ९९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रथू होतील. शिवाय काही ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुका होणार आहेत. यानंतरच यंदाच्या वर्षातील ७६८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या वर्षात मुदत संपणार्या ग्रामपंचायती
अकोले ५२, संगमनेर ९४, कोपरगाव २९, राहाता २५, श्रीरामपूर २७, राहुरी ४४, नेवासा ५९, पाथर्डी ७८, शेवगाव ४८, कर्जत ५६, जामखेड ४७, पारनेर ८८, श्रीगोंदा ५९. एकूण ७६५.




