एकनाथ शिंदेंची शिवसेना पिंपरीत स्वबळावर लढण्यास तयार!
खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत ३२ प्रभागातील १२८ जागांवर स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे शिवसेनेचे (शिंदे) खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. युतीबाबत वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने शिवसेनेचा शनिवारी पिंपरीत पदाधिकारी प्रशिक्षण मेळावा पार पडला. यावेळी बारणे यांनी ही माहिती दिली. उपनेत्या सुलभा उबाळे, इरफान सय्यद, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे, महानगर प्रमुख राजेश वाबळे, शहरप्रमुख निलेश तरस, महिला संघटिका सरिता साने यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा – खेळ, नृत्य आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमात विद्यार्थी रमले!
खासदार बारणे म्हणाले, भाजप आणि शिवसेनेची नैसर्गिक युती आहे. महापालिका निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. भाजपसोबत युतीला प्राधान्य आहे. शिवसेनेने १२८ जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसैनिकांनी गाफील राहू नये. मतदारयाद्याकडे लक्ष द्यावे. प्रभागाचा बारकाईने अभ्यास करावा. सूक्ष्म नियोजन करून कामाला लागावे. महापालिका सभागृहात शिवसेनेचे संख्याबळ वाढवायचे आहे. त्यादृष्टीने कामाला सुरुवात करावी.




