breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘समृद्धी महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण

मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याचे २४ जिल्हे जोडले जाणार आहेत. विकासाचा हा महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर येत्या काळात राज्यात समृद्धी सारखे अनेक प्रकल्प‌ राज्यात राबविण्यात येतील. राज्यातील सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाने जोडण्यात येतील. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

जेऊर कुंभारी (ता.कोपरगाव) शिर्डी पथकर प्लाझा येथे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जे स्वप्न पाहिले होते त्या स्वप्नांची समृद्धीच्या रूपात पूर्तता झाली आहे. विक्रमी वेळेमध्ये जमीन अधिग्रहण करण्यात आले. शेतकऱ्यांना आरटीजीएसच्या माध्यमातून मोबदला रक्कम देण्यात आली. सर्व अडथळ्यांवर मात करून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला‌. विकासाच्या या महामार्गामुळे राज्याच्या कृषी, उद्योग व पर्यटनाला निश्चितच वाव मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

समृद्धीसारख्या रस्त्यांचे जाळे निर्माण करणे काळाची गरज आहे. समृद्धीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे १३ कृषी प्रकल्प साकार होणार आहेत. समृद्धी सोबत नागपूर ते गोंदिया या महामार्ग प्रकल्प साकार होणार आहे. नागरिकांना सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागू नये यासाठी ‘शासन आपल्या दारी’ मोहीम राबविण्यात येत आहे. याचा हजारो नागरिकांना फायदा होत आहे. शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून वार्षिक १२ हजार रूपयांची मदत करण्यात येत आहे. लेक लाडकी योजनेतून मुलींच्या भविष्यासाठी शासनाने तरतूद केली आहे. शिर्डी विमानतळाच्या ६०० कोटींच्या प्रस्तावित टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

हेही वाचा – रयतेचे कल्याणकारी राज्य हवे; तर ‘‘स्वराज्य यात्रेत’’ सहभागी व्हा : आपचे नेते मयूर दौंडकर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याचा विकास करायचा असेल तर विकासात मागास असलेला भाग मुंबई व पोर्टशी जोडणे अत्यंत आवश्यक होते. समृद्धी महामार्ग राज्याचा आर्थिक कॅरिडॉर ठरणार आहे. यामुळे राज्यातील १५ जिल्ह्यांचे भाग्य बदलणार आहे. ७०१ किलोमीटर महामार्गाची उभारणी विक्रमी अशा ९ महिन्याच्या कालावधीत पूर्ण होणारा समृद्धी हा देशातला एकमेव महामार्ग आहे. महामार्गासाठी केलेल्या भूसंपादनाचा शेतकऱ्यांना विक्रमी मोबदला देण्यात आला. पुढील सहा महिन्यात समृद्धी प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. महामार्गावर वाहन चालकांनी वाहन चालवितांना वेग मर्यादा पाळावी. असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

समृद्धी महामार्ग, ट्रान्स हॉर्बर लिंक रोड, कोस्टल रोड सारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा बळकट होणार आहेत. नागपूर ते गोवा, मुंबई ते गोवा या महामार्गामुळे येत्या काळात महाराष्ट्राचे चित्र बदलण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे काम शासन करत आहे. असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

समृद्धी महामार्ग दुसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये –

समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात ७ मोठे पूल, १८ छोटे पूल, वाहनांसाठी ३० भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी २३ भुयारी मार्ग, ३ पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज, ५६ टोल बूथ, ६ वे ब्रिज आदी सुविधांचा समावेश आहे. शिर्डी ते इगतपुरी तालुक्यामधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या या दुसऱ्या टप्प्याचा खर्च ३२०० कोटी रुपये असून लांबी ८० कि मी आहे. दुसऱ्या टप्प्यात आजपासून ७०१ कि.मी पैकी आता एकूण ६०० कि.मी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस खुला झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button