..म्हणून मला हलक्यात घेऊ नका; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा

मुंबई | शिनसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीला जाणे टाळल्याच्या मुद्द्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्याचा संदर्भ देत त्यांना हलक्यात घेऊ नका असा इशारा दिला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, की मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मात्र मी बाळासाहेब आणि दिघेसाहेब यांचा कार्यकर्ता देखील आहे आणि प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे. मला जेव्हा हलक्यात घेतले तेव्हा २०२२ मध्ये टांगा पलटी केला. सरकार बदललं, सामान्य नागरिकांच्या मनातील सरकार तेथे आणलं. जे लोकांना हवं होतं ते डबल इंजिनचं सरकार तेथे आलं. म्हणून मला हलक्यात घेऊ नका, हा इशारा ज्यांना समजून घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा.
हेही वाचा : बोऱ्हाडेवाडी, जाधववाडीतील प्रस्तावित रस्त्यांच्या कामाला गती
माझ्या विधानसभेतील पहिल्या भाषणात मी म्हणालो होतो की देवेंद्र फडणवीस यांना २०० हून जास्त जागा मिळतील, आणि आम्हाला २३२ जागा मिळाल्या. त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका. हे ज्यांच्यासाठी आहे त्यांच्या हे लक्षात येईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा देखील अद्याप सुटलेला नाही, यावरून देखील सध्या महायुतीत रस्सीखेच पहायाला मिळत आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी कसल्याही प्रकारचे कोल्ड वॉर सुरू नसल्याचे म्हटले आहे. विकासाला विरोध करणार्याविरूद्ध आम्ही एक आहोत असेही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.