आमच्या मर्यादेचा अंत पाहू नका; अजित पवार गटाचा शिंदे गटाला इशारा
![Don't see the end of our limitations, said Amol Mitkari](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/Ajit-Pawar-and-Eknath-Shinde-780x470.jpg)
पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीतील ‘एकनाथ गणेश महोत्सव २०२४’ या फेस्टिवलला भेटीसाठी न आल्याने शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांचे फोटो काळ्या कपड्याने झाकले. दरम्यान, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, प्रत्येक पक्षात असे हौशे, नवशे, गवसे असतात. कोणी काळे झेंडे दाखवून अपमान करतं, तर कोणी पोस्टर काळ्या कपड्याने झाकून विरोध दर्शवतं. मात्र यामुळे त्यांच्याच पक्षांची बदनामी होते. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या कार्यकर्त्या आशा बुचके यांनी अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. त्यांच्यामुळे भाजपाचीच बदनाम झाली. आता शिंदे गटाच्या बारामती जिल्हाध्यक्षाने अजित पवारांचं पोस्टर काळ्या कपड्याने झाकलं आहे. त्यांच्या या कृतीमुळे शिवसेनेचा शिंदे गट बदनाम झाला आहे. या घटनांमुळे कधी भाजपाची तर कधी शिंदे गटाची बदनामी होते.
हेही वाचा – ‘मी तेव्हा जम्मू-काश्मीरला जायला घाबरलो होतो’; सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानाची चर्चा
महायुतीत तीन पक्षांमध्ये एकवाक्यता असायला हवी. ती असल्याशिवाय विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळणार नाही. अशा पद्धतीने दररोज जाणीवपूर्वक काहीतरी नवीन गोष्ट करून एखाद्या पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न होत असेल तर महायुतीच्या समन्वय समितीने यात लक्ष घातलं पाहिजे. या लोकांना त्यांच्या वरिष्ठांनी तंबी दिली पाहिजे. कारण आमच्याही भावनेला काही मर्यादा आहेत. आमच्याही भावनेचा उद्रेक होऊ शकतो आणि तसं झाल्यास मोठा विध्वंस होईल, असं अमोल मिटकरी म्हणाले.
कोणताही कार्यकर्ता उठतो आणि अशा प्रकारे अजित पवारांच्या पोस्टरवर काळा कपडा टाकून सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून मला असं वाटतं की हा उन्मत्तपणा आहे. त्यांच्या उन्मत्तपणाला आमच्या कार्यकर्त्यांनी उत्तर दिलं आहे. शिशुपालासारख्या शंभर चुका माफ होतात. शेवटी भगवान श्रीकृष्णानेही संयम सोडला होता. आपण ते महाभरतात वाचलंच आहे. घोडा अन् मैदान दूर नाही, अजून वेळ गेली नाही. त्यांच्या नेत्यांनी त्यांना योग्य समज द्यावी. शेवटी आमच्या संयमालाही काही मर्यादा आहेत, आमच्या मर्यादेचा अंत पाहू नका, असा इशाराही अमोल मिटकरी यांनी दिला.