पुण्यात भाजपाच्या ‘‘दवंडी’’ची चर्चा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक सभे पुणेकरांना निमंत्रण!
लोकसभा निवडणूक रणसंग्राम : पारंपरिक पद्धतीने निमंत्रण देत लक्ष वेधले
![Discussion of BJP's "Dawandi" in Pune: Prime Minister Narendra Modi's historic meeting invitation to Pune people!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Pune-BJP-780x470.jpg)
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात जोरदार प्रचार सभा होत आहेत. याच अनुषंगाने उद्या पुण्यात नरेंद्र मोदी यांची राज्यातील महायुतीकडून जाहीर सभा आयोजित करण्यात आलीय. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर होत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आता पुण्यात पारंपारिक पद्धतीने दवंडी देऊन आमंत्रण दिलं जात आहे. त्यामुळे याची सध्या जोरदार चर्चा आहे.
पुण्यातील लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक सभा होत आहे. या सभेला बारामती, मावळ, शिरूर सह पुणे लोकसभा मतदारसंघातील लोकांची गर्दी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच काल भाजपचे युवा नेते गिरीश खत्री मित्र परिवाराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पारंपारिक दवंडीद्वारे पुणेकरांना निमंत्रण देण्यात आले.
गिरीश खत्री मित्र परिवाराच्या वतीने नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्य नगरीचे ग्राम दैवत श्री कसबा गणपती, श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती मंदिर, तांबडी जोगेश्वरी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, ताथवडे उद्यान अश्या शहरातील विविध भागात दवंडीद्वारे पारंपरिक पद्धतीने निमंत्रण देण्यात आले. याशिवाय शहरातील विविध भागात, विविध मंदिरे, सामाजिक – ऐतिहासिक ठिकाणी आणि कलाकार कट्टा इत्यादी मोक्याच्या ठिकाणी दवंडी देत पुणेकरांना जास्तीत जास्त संख्येने मोदींच्या सभेला उपस्थित राहावे म्हणून निमंत्रित केले.