जनतेशी थेट ‘कनेक्टिव्हिटी’ : महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांची ‘बारी सुसाट’
शिरुर लोकसभा निवडणूक : खासदार अमोल कोल्हे - आढळराव पाटील यांच्यात अतितटीचा सामना
पिंपरी : विशेष प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षात निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही लोकांशी कनेक्ट राहिल्यामुळे त्याचा फायदा सध्याच्या निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना होताना दिसत आहे. विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या तुलनेत आढळराव पाटील संपर्कात आघाडीवर आहेत. त्यामुळे संपर्कात राहणारा खासदार कोण याबाबत मतदारांमध्ये चर्चा रंगताना कोल्हे मात्र पिछाडीवर पडत असल्याचे दिसते.
लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. तिसऱ्या टप्प्यात शिरूर लोकसभेचे मतदान होणार आहे. सध्या प्रचाराला रंग चढू लागला आहे. राज्यातील आणि देशातील नेत्यांच्या प्रचार तोफा देखील धडाडत आहेत. सभांमधून उमेदवारांच्या तुलना होताना दिसत आहे. त्याचाच प्रत्यय शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील येताना दिसत आहे. या मतदारसंघात संपर्कात कोण कमी अथवा जास्त आहे, यावर अधिक भर दिला असल्याचे दिसत आहे. विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे गेल्या पाच वर्षात मतदारांसोबत संपर्क ठेवण्यात कमी पडल्याचे राजकीय वास्तव आहे. ही खंत राष्ट्रवादीच्या फुटी पूर्वी त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते व्यक्त करत होते. त्यामुळे कोल्हे यांचे राजकीय वजन देखील खालावल्याची चर्चा होती. सध्याच्या प्रचारात देखील मतदारांमधून हाच प्रश्न उपस्थित केल्याचे पाहायला मिळत आहे. त्याला उत्तर देताना लोकसभेत प्रश्न मांडणारा मी खासदार असल्याचे कोल्हे सांगत असले तरी हा राजकीय प्रोपोगंडा मतदार संघात फिट होताना दिसत नाही.
याउलट पराभूत झाल्यापासून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सतत लोकांमध्ये मिसळत राहिले. विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय दिसले. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी चालूच ठेवल्या. प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांकडे भेटी घेऊन रखडलेले प्रश्न मांडत होते. भविष्यातील राजकीय चित्र काय असेल याबाबत साशंकता असताना देखील त्यांनी आपले काम चालूच ठेवल्याचे दिसत होते. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार म्हणून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचेच नाव राजकीय जाणकारांच्या मधून देखील चर्चेत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ही जागा सोडल्यानंतर त्यांनी देखील आढळराव पाटील यांच्याच नावाला पसंती दिली. त्यावरून आढळराव पाटील यांची जनतेसोबतची कनेक्टिव्हिटी स्पष्ट होते. पराभूत होऊनही लोकांच्या सोबत संपर्क ठेवण्याचा फायदा आढळराव यांना सध्याचा राजकीय प्रोपोगंडा राबवताना फायद्याचा ठरत असल्याचे बोलले जात आहे.
महायुतीचा आढळरावांना फायदा….
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उभे आहेत. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेची देखील साथ आहे. तर महायुतीतील मित्र पक्षा ंची मैत्री जपण्यासाठी भाजपाने देखील चंग बांधला असल्याने त्याचा फायदा आढळराव पाटील यांना होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे खासदार अमोल कोल्हे यांना मात्र खासदार शरद पवार यांच्या नावाचा वापर करूनच निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.