संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा; ‘खाटकाच्या लाकडावर बकरा’ पोस्टमागील अर्थ उलगडला

मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर एका बकऱ्याचा फोटो पोस्ट करत ‘ए सं शी गट’ असा उल्लेख केला होता. या बकऱ्याचा फोटो खाटकाच्या लाकडावर उभ्या असलेल्या प्राण्याचा होता. या पोस्टमागील अर्थ आज त्यांनी पत्रकार परिषदेत उलगडला. राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाचा उल्लेख ‘ए सं शी’ असा करत त्यांच्यावर जोरदार टीका केली.
संजय राऊत म्हणाले, “तुम्ही सगळे पत्रकार आहात, तुम्ही त्या फोटोचा अर्थ काढू शकता. महाराष्ट्रातला एक बकरा आहे, तो खाटकाच्या लाकडावर उभा आहे. गावात खाटकाच्या दुकानात असं लाकूड पाहिलं असेल. तसं महाराष्ट्रातल्या या बकऱ्याला खाटकाच्या लाकडावर उभं केलं आहे. दिल्लीतून त्याला सांगण्यात आलं आहे की, फार शहाणपणा केलास तर मान उडवेन. गप्प उभं राहायचं आणि फक्त बे बे करायचं आहे, असं त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीतून कुणीतरी सांगितलं आहे.”
संजय राऊत यांनी पुढे सांगितलं, “ए सं शी गट म्हणजे काय, हे तुम्हाला कळलं पाहिजे. पुढच्या दोन-तीन दिवसांत माझ्या ट्वीटचा अर्थ तुम्हाला कळेल. आज अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत. मी सध्या जास्त बोलणार नाही. पण इतकंच सांगतो की, आता बकरा कापण्याची सगळी तयारी झाली आहे. वेळ आल्यावर मी सांगेन किंवा त्याआधी तुम्हालाही कळेलच.”
उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘ए सं शी’ असा उल्लेख केला होता. त्याचप्रमाणे राऊत यांनीही आज शिंदे गटाला ‘ए सं शी’ म्हणत हल्ला चढवला. याशिवाय, राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस आम्हाला मूर्ख म्हणत आहेत, ठीक आहे. पण त्यांना माझा सल्ला आहे की इतका चिडचिडेपणा करू नका. जेव्हा समोरचा माणूस सत्य बोलत असतो आणि द्यायला उत्तर नसतं, तेव्हा अशी चिडचिड होते. मी प्रश्न विचारतो तेव्हा त्यांच्याकडे उत्तर नसतं, म्हणून ते चिडचिड करतात.”