व्हीआयपी ऑडिओ टेप प्रकरणातील अभिनेत्री उर्मिला सनावरला अटक; ५ कोटींच्या खंडणीचा आरोप
माजी भाजप आमदार सुरेश राठोड यांच्या मुलीची पोलिसांत तक्रार; कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप

डेहराडून : ऋषिकेश रिसॉर्ट हत्या प्रकरणाशी संबंधित कथित ‘व्हीआयपी’ ऑडिओ टेपमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्री उर्मिला सनावर हिला पोलिसांनी अटक केली आहे. माजी भाजप आमदार सुरेश राठोड यांच्या मुलीने तिच्याविरोधात पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची, रविदास धामची मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्याची मागणी केल्याची आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली असून, अभिनेत्रीला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती हरिद्वार पोलिसांनी दिली.
खंडणी आणि धमकी दिल्याचा आरोप
तक्रारदार तरुणीच्या आरोपानुसार, उर्मिला सनावर हिने शनिवारी रात्री फोन करून पाच कोटी रुपये देण्याची आणि रविदास धामची मालमत्ता तिच्या नावावर हस्तांतरित करण्याची मागणी केली. मागण्या पूर्ण न केल्यास कुटुंबातील सदस्यांना ठार मारण्याची तसेच सुरेश राठोड यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याशिवाय, सनावर हिने सोशल मीडियावर आपल्या वडिलांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आरोप करत धमकी दिल्याचाही दावा तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणी हरिद्वारमधील रानीपूर पोलीस ठाण्यात खंडणी, गुन्हेगारी धमकी आणि सोशल मीडियावरील कथित आक्षेपार्ह टिप्पण्यांसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा – मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात मोठी घडामोड; फडणवीसांचे SIT चौकशीचे आदेश
एसएसपींकडून अटकेला दुजोरा
हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक नवनीत सिंग भुल्लर यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या माहितीनुसार, सुरेश राठोड यांच्या मुलीने रविवारी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे उर्मिला सनावरविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, तिला अटक करण्यात आली आहे. तिला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलीस नोंदींनुसार, उर्मिला सनावरविरोधात सहारनपूर, डेहराडून, रानीपूर आणि हरिद्वार येथे यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याचे वृत्त आहे. याआधी सुरेश राठोड यांच्या मुलीने दाखल केलेल्या तक्रारीत सनावर आणि तिच्या एका पुरुष सहकाऱ्यावर आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप केला होता. त्या प्रकरणात पुरुष आरोपीला अटक करण्यात आली होती आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
ऋषिकेश हत्या प्रकरणातील ऑडिओ टेपमुळे चर्चेत
उर्मिला सनावर हिने प्रसिद्ध केलेल्या कथित ऑडिओ रेकॉर्डिंगची स्वतंत्र चौकशी सुरू असल्याचे वृत्त आहे. या ऑडिओमध्ये २०२२ मधील ऋषिकेश रिसॉर्ट हत्या प्रकरणातील एका राजकीयदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तीचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे उत्तराखंडच्या राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, २३ ऑक्टोबर रोजी उर्मिला सनावर आणि सुरेश राठोड हे दोघेही डेहराडून येथील विशेष सीबीआय न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळी त्यांनी ऋषिकेश रिसॉर्ट हत्या प्रकरणासंदर्भात नार्को-ॲनालिसिस चाचणी करून घेण्यास संमती दर्शवल्याचे वृत्त आहे. या प्रकरणावर २६ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार होती. मात्र, त्याआधीच सनावरला अटक करण्यात आली.




