‘गृहमंत्रीपद आमच्याकडेच राहिलं पाहिजे..’; देवेंद्र फडणवीसांची भूमिका
![Devendra Fadnavis said that the post of Home Minister should remain with us.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/Devendra-Fadnavis-and-Eknath-Shinde-780x470.jpg)
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (५ डिसेंबर) महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर, एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दुसरीकडे, महायुतीत गृहमंत्री पदासाठी रस्सीखेच चालू असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपद मागितलं आहे का? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, नाही! त्यांनी असं कुठलंही मंत्रीपद मागितलेलं नाही. त्यांनी फक्त तीन ते चार खात्यांवर चर्चा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आम्ही त्यावर चर्चा करून निर्णय घेऊ.
हेही वाचा – महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी?
तुम्ही गृहमंत्रीपद सोडणार नाही असं म्हटलं जातंय, त्याबद्दल काय सांगाल? यावर फडणवीस म्हणाले, तसं बघायला गेलं तर गृहमंत्रीपद आमच्याकडेच राहिलं पाहिजे असं मला वाटतं. परंतु, तसा काही हट्ट नाही. आजवर हे खातं आमच्याकडे राहिलं आहे.
आम्ही तिघेही एकत्रच आहोत. मात्र, गृहमंत्रीपद सांभाळत असताना केंद्र सरकारशी, केंद्रीय गृह मंत्रालयाशी समन्वय ठेवावा लागतो. या राज्यात नक्षलवादाची समस्या आहे. मुंबईसारखं मोठे शहर सांभाळायचं आहे. हे शहराची परिस्थिती खूप नाजूकपणे हाताळावी लागते. ही एक प्रकारे देशाची राजधानी आहे. माझा भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाशी नेहमी संपर्क असतो. आम्ही चांगल्या प्रकारे समन्वय राखतो. मी केंद्रीय गृह मंत्रालयाशी चांगल्या प्रकारे समन्वय साधू शकतो. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार देखील ते करू शकतात. परंतु, माझा केंद्रीय नेतृत्वाशी जास्तीत जास्त संबंध येतो. त्यामुळे गृहमंत्रालय हे आमच्याकडे असावं, भारतीय जनता पार्टीकडे असावं असं मला वाटतं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.