महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
![Devendra Fadnavis said that the next Chief Minister of Maharashtra will be from the Grand Alliance](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Devendra-Fadnavis-3-780x470.jpg)
मुंबई | महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आहे. या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे २ उपमुख्यमंत्री आहेत. युतीत शिंदेंची शिवसेना, भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांचा सहभाग आहे. या तीन्ही पक्षाचे नेते आणि पदाधिकारी सातत्याने आपापल्या नेत्याचा पुढचे मुख्यमंत्री म्हणून प्रचार करत आहेत. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला असता. ते म्हणाले, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा महायुतीचाच असेल, यात काहीच शंका नाही. आम्ही सध्या संख्याबळ वगैरे काही ठरवलेलं नाही. संख्याबळ तर आमचंच जास्त असणार आहे. त्याबाबत कोणाच्याही मनात शंका येण्याचं कारण नाही. परंतु, मी एक गोष्ट स्पष्ट करेन की, केवळ संख्याबळाच्या आधारावर पुढचा मुख्यमंत्री ठरणार नाही. आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत. मुख्यमंत्रीपदाबाबत आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. शेवटी तिन्ही पक्षांना विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल.
हेही वाचा – जरांगेंकडून उपचार घेण्यास होकार, मराठा समाजाकडून आज ‘चक्काजाम’ आंदोलन
प्रत्येक नेता पदाधिकारी त्यांच्या प्रमुख नेत्याचं नाव घेत असतो. शेवटी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन द्यायचं असतं. माझा नेता मोठा झाला पाहिजे, अशी प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते. त्यामुळे उद्या माझ्या पक्षाचे लोक म्हणतील की देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. तसं बोलल्यावर आमच्या लोकांना त्याचा आनंद होणार. तुम्ही जर शिवसेनेच्या लोकांसमोर भाषणात सांगितलं की, अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री होतील तर लोक टाळ्या वाजवतील पण कमी वाजवतील. त्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह येणार नाही. कारण शिवसैनिकांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असंच वाटत राहील. तसंच अजित पवारांच्या समर्थकांना वाटत राहणार की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत. परंतु, भविष्यात आम्ही तिघे एकत्र बसून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेऊ. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची मोठी भूमिका असेल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.