लाल संविधान का? कुणाला इशारा देत आहात? देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना सवाल
![Devendra Fadnavis said that Rahul Gandhi is warning someone by showing the red constitution](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Devendra-Fadnavis-and--780x470.jpg)
मुंबई | लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या हातात लाल रंगाचं संविधानाचं पुस्तक घेऊन फिरत आहेत. राहुल गांधी नागपुरातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. ते ६ नोव्हेंबरला नागपूरला आयोजित संविधान सन्मान संमेलनात सहभागी होणार आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
भारत जोडो हा समूह तयार करण्यात आला आहे. या समूहामध्ये अनेक संघटना अतिशय डाव्या विचारांच्या आहेत. त्यांच्या कामाची पद्धत, ध्येय धोरणे ही अराजक पसरवणारी यंत्रणा आहे. एकीकडे राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. संविधानाचा सन्मानच केला पाहिजे. पण लाल संविधानच का? कोणाला तुम्ही इशारा देताय? लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देताय? संविधानाचा अर्थ असतो ऑर्डर. तुम्ही अराजक पसरवत आहात, असं फडणवीस म्हणाले.
हेही वाचा – ‘भारतीय जनता पक्षात ज्या नावांची चर्चा असते ते मुख्यमंत्री होत नाहीत’; विनोद तावडे यांचं विधान चर्चेत
संविधान आणि भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता पसरवणाऱ्यांना एकत्र करून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. अर्बन नक्षलवादाचा हा प्रयत्न आहे. अर्बन नक्षलवादाचा हाच अर्थ आहे की लोकांची मने कलुषित करायची. त्यांच्यामध्ये अराजकतेचं एक रोपण करायचं, जेणेकरून देशातील संस्था, यंत्रणा यावरून त्यांचा विश्वास उडेल. यामुळे देशाच्या एकतेला आणि एकात्मकतेला धोका निर्माण होईल, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, राहुल गांधी यांची नागपुरात संविधान सभा होणार असली तरी खोट्याचे वय अत्यंत अल्प असते. लोकसभा निवडणुकीच्या काळात पसरवलेला भ्रम आता दूर झाला आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसचे नाटक जनता आता चालू देणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.