मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे १२ डिसेंबरला पहिल्यांदा नगर आगमन
भाजपाकडून त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी
नागपूर : मुख्यमंत्री बनल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे गुरुवारी १२ डिसेंबरला पहिल्यांदा नगर आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी भाजपाकडून जय्यत तयारी सुरू आहे. ठिकठिकाणी पुष्पवृष्टीसह ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांकडून नियोजन केले जात आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवसभर शहरात मुक्कामी राहणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी विदर्भातील हजारो कार्यकर्ते मुंबईला गेले होते. फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे प्रथमच नगरागमन होत आहे. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू असून त्यात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होत आहे. शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता होती.
मात्र, अद्यापही तिन्ही पक्षांकडून संभाव्य मंत्र्यांची यादी तयार झालेली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात १२ डिसेंबरला फडणवीस शहरात येणार असल्याचे संकेत आहेत. शेकडो कार्यकर्ते मुंबईला गेले असले तरी अनेकांना या सोहळ्यात सहभागी होता आले नाही. त्यांच्याकडून फडणवीसांच्या स्वागतासाठी तयारी करण्यात येत आहे. त्यात कार्यकर्ते, समर्थक, सर्वसामान्य लाडक्या बहिणींचाही समावेश मोठ्या प्रमाणात आहे.
मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते कामात व्यस्त झालेले आहे. त्यामुळे त्यांचे शहरात येऊ शकले नाही. त्यांना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते आतूर झालेले आहेत. भाजपचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी सांगितले की १२ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस शहरात येणार आहे. त्यादृष्टीने तयारी जोमाने सुरू केलेली आहे.
न भूतो न भविष्यती स्वागतासाठी नियोजन
फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर विमानतळ ते धरमपेठ निवासस्थानापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी रथाचे कामही सुरू झालेले आहे. संपूर्ण मार्गात भगव्या पताका लावण्यात येणार असून संपूर्ण परिसर भगवामय केला जाणार आहे. याशिवाय झेंडे, कट आऊटस, मार्गावर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी, अनेक ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने स्वागत, जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.





