breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

‘मावळ लोकसभा निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज’; दीपक सिंगला

पुणे | मावळ लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.

मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती प्रसार माध्यमांना देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दीपक सिंगला बोलत होते.

यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे निवडणूक समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे, हिंमत खराडे, निवडणूक समन्वयक अभिजित जगताप, निवडणूक सहाय्यक सचिन मस्के, मनिषा तेलभाते, मनुष्यबळ कक्ष समन्वयक राजू ठाणगे आदी उपस्थित होते.

येत्या ४ जून रोजी बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी पार पडणार आहे. याठिकाणी सुरक्षा कक्षात (स्ट्राँग मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे व टपाली मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. मतमोजणीच्या दिवशी या सुरक्षा कक्षाचे सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मावळ लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येऊन सकाळी ८ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल.

हेही वाचा    –    ‘पंतप्रधान मोदींची प्रकृती बरी नाही, पण…’; ठाकरे गटाचा टोला 

मतमोजणीसाठी टेबल आणि फेऱ्यांची रचना

मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहेत. पनवेल आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी २४ टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी २३ फेऱ्या होणार आहेत. कर्जत आणि उरण विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी १४ टेबल आणि २४ फेऱ्या तर मावळ आणि पिंपरी विधानसभा मतदार संघासाठी १६ टेबल लावण्यात येणार असून २५ फेऱ्या होणार आहेत. टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र ५ टेबल याप्रमाणे एकूण ११३ टेबलवर मतमोजणी होईल.

मतमोजणीसाठी मनुष्यबळाची नियुक्ती

मतमोजणीसाठी एकूण १ हजार ५३० अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सहा मतदार संघांसाठी ६ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, ९ अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, ५८ इतर अधिकारी, २०५ सूक्ष्म निरीक्षक, ११८ मतमोजणी पर्यवेक्षक, १७५ मतमोजणी सहाय्यक, ९६ तालिका कर्मचारी यांच्याशिवाय ८६३ शिपाई, हमाल व इतर कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे.

मतमोजणी केंद्रात मोबाईलसह प्रतिबंधीत वस्तू आणण्यास मनाई

निवडणूकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्यूलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वैध ओळखपत्र नसलेल्या कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तयारी

कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतमोजणीच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी तसेच प्राधिकृत माध्यम प्रतिनिधींना बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून प्रवेश दिला जाईल. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राजवाडा गेटने प्रवेश दिला जाईल. १५० मीटर परिसरात इतरांना प्रवेश प्रतिबंधीत करण्यात आला आहे. नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button