पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानासाठी पाच ब्रँड अँबेसिडर नियुक्त

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराला देशातील सर्वात सुंदर शहर बनविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. स्वच्छ भारत अभियान पिंपरी चिंचवड शहरांमध्ये राबविण्यात येत आहे. याकरिता लोकसहभाग महत्त्वाचा आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत स्वच्छतेची लोक चळवळ व्यापक करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान ब्रँड अँबेसिडर नियुक्त करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ करिता पाच ब्रँड अँबेसिडर नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना त्याबाबतचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
यशवंत गंगाराम कण्हेरे, पूजा शेलार, संगीता किशोर जोशी-काळभोर, मनोज वसंत देवकर व आदिती निकम यांना ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छते विषयक मोहिमेमध्ये त्यांनी सहभागी व्हावे अशी विनंती मनपाने केली आहे. याबाबतचे आदेश आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे यांनी 4 जूनला काढले आहेत. पण, ब्रँड अँबेसिडर पदी नियुक्तीचे पत्र ब्रँड अँबेसिडर यांना शनिवारी (दि. 6) प्राप्त झाले आहेत.
हेही वाचा – उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक वारीत सहभागी
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंचचे अध्यक्ष यशवंत कण्हेरे सध्या आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त दिंडीत सहभागी झाले आहेत. शनिवारी लोणंद मुक्कामी त्यांचा ‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान’च्या वतीने रामचंद्र कापसे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. सन्मानाला उत्तर देताना कण्हेरे म्हणाले, “हा सन्मान माझा एकट्याचा नव्हे तर स्वच्छता अभियानात सहकार्य करणाऱ्या, सहभागी होणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा व आरोग्य सेवकांचा आहे.”असे शिवानंद चौगुले यांनी प्रास्ताविक केले.





