मराठा आरक्षणावरून अमोल मिटकरींनी मांडलेल्या भूमिकेमुळे वादाची शक्यता; म्हणाले..
![Controversy due to Amol Mitkari's position on Maratha reservation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Amol-Mitkari--780x470.jpg)
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा नववा दिवस आहे. आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे वाद होण्याची शक्यता आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, अकोला जिल्ह्यात आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजातील काही आंदोलक मला भेटायला आले होते. त्यांची भूमिका आहे की मराठा समाजाला सरसकट जातप्रमाणपत्र मिळालं पाहिजे. आंदोलनात बहुसंख्य कुणबी बांधवही होते. परंतु, कुणबी बांधवांची भूमिका असली पाहिजे की मराठ्यांना सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र द्यायला आमची हरकत नाही. जेणेकरून आरक्षणाचा तिढा सोडवताना जास्त अडचणी येणार नाहीत.
हेही वाचा – फळांच्या व भाज्यांच्या रंगावरून समजतात त्यामधील गुणधर्म!
ज्याप्रमाणे सकल मराठा समाजाच्या भावना सगळे आमदार समजून घेत आहेत. तसेच सकल मराठा समाजाबरोबर जे कुणबी येत आहेत त्यांनीसुद्धा मोठा भाऊ म्हणून मराठा समाजाबद्दल भूमिका जाहीर करावी. ओबीसींमधल्या कुणबी समाजाने मन मोठं करावं. कुणबी समाजातून मराठ्यांना सरसकट जातप्रमाणपत्र द्यायला आमची हरकत नाही, मराठ्यांना आरक्षण द्यायला आमची हरकत नाही अशी भूमिका ओबीसींमधल्या कुणबी समुदायाने घ्यावी. अशीच विनंती मी कुणबी प्रतिनिधिंना केली आहे आणि त्यांनी त्यास होकार दर्शवला आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले.
अकोला सकल मराठा समाजातील कुणबी बांधवांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास होकार दर्शवला आहे. त्यांचं निवेदन मी स्वीकारलं आहे. त्याचबरोबर आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारने एकदिवसीय अधिवेशन बोलवावं, अशी आमची मागणी आहे. त्या अधिवेशनात आम्ही हा मुद्दा मांडू. अधिवेशन बोलावण्यास आम्ही आग्रही आहोत, असंही अमोल मिटकरी म्हणाले.