“नंगानाच होऊ देणार नाही..”महिला आयोगाच्या नोटिसीला चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर
56 नोटीशीत आणखी १ ची भर..!; माझी लढाई अशीच सुरूच राहणार
मुंबई : उर्फी जावेद प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांना महिला आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे. चित्रा वाघ यांनी 2 दिवसांत खुलासा करावा अन्यथा राज्य महिला आयोग एकतर्फी निर्णय देईल, असा थेट इशारा आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.
महिला आयोगाच्या नोटिसीला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे.. राहिला विषय नोटीसीचा तर मला येणाऱ्या अशा 56 नोटीशीत आणखी १ ची भर..! जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी तर तिला ती न देता हा नंगानाच होऊ देणार नाही, अशी भूमिका घेणारीला पाठवली, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार!, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
राज्य महिला आयोग स्वतंत्रपणे काम करतो असं असताना राज्य महिला आयोगाची प्रतिमेला तडा जाईल असे वर्तन चित्रा वाघ यांनी केले आहे. त्या कारणाने त्यांना नोटीस पाठवली आहे चित्रा वाघ यांनी 2 दिवसांत खुलासा करावा अन्यथा राज्य महिला आयोग एकतर्फी निर्णय देईल, असा इशारा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.