breaking-newsTOP Newsपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारणलेखसंपादकीय

ग्राऊंड रिपोर्ट: चिंचवडकरांना आता कळलं असेल…पोटनिवडणुकीत राहुलदादाला तिकीट का नाकारले?

राज्यातील सत्ता नाट्यानंतर कलाटे समर्थकांचा सोशल मीडियावर संताप : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयामुळे अनेकांची राजकीय करिअर ‘उद्ध्वस्त’

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
राज्यात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासह राष्ट्रवादीच्या अन्य आठ नेते मंत्री झाले. मात्र, स्थानिक पातळीवर अनेकांची राजकीय करिअर ‘उद्ध्वस्त’ झाली आहेत. कालपर्यंत भाजपाच्या विरोधात टीका-टीपण्णी करणारे आणि पक्षाची भूमिका प्रखरपणे मांडणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आता भाजपाप्रणित सरकारचे गोडवे गावे लागणार आहेत. अशाचत ‘‘…चिंचवड पोटनिवडणुकीत राहुलदादा कलाटे यांना तिकीट का नाकारले’’ असा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा-शिवसेना (शिंदे गट) अशी लढत होणार असे निश्चित असताना चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ झाला. या बंडखोरीमागे भाजपाचा हात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यावेळी कलाटे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी केला होता. मात्र, त्यांनी माघार घेतली नाही.

वास्तविक, भाजपा महायुतीच्या उमेदवार म्हणून अश्विनी जगताप यांच्यासाठी ‘सेफ’ लढाई करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात निवडणुकीपूर्वीच समझोता झाला होता. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत राहुल कलाटे की नाना काटे ? असा उमेदवारीचा तिढा कायम ठेवण्यात आला. शेवटी काटे यांना उमेदवारी देण्यात आली आणि कलाटे यांनी बंडखोरी केली. याचा थेट फायदा भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना झाला.

क्षमता असतानाही राहुल कलाटे यांना तिकीट नाकारण्यात आले. अजित पवार यांची बोटचेपी भूमिका भाजपाधार्जिणी होती. त्यामुळे राहुल कलाटे आणि नाना काटे दोघांचे नुकसान झाले, अशी भावना कलाटे आणि काटे समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. त्याला कालच्या सत्ता नाट्यानंतर फुंकर मिळाली. त्यामुळे सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

पक्षश्रेष्ठी भरोशावर राजकारण नकोच…

आगामी काळात चिंचवड पोटनिवडणुकीसारखी परिस्थिती निर्माण होणार असून, महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत अनेकांचा ‘राजकीय बळी’ होणार आहे. स्थानिक पातळीवर एकमेकांत राजकीय संघर्ष पेटवून वेळप्रसंगी सत्तेत सहभागी होणारे नेते आणि पक्ष यांची भूमिका आत्मघातकी ठरणार आहे. पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ ‘तडजोडी’ केल्यामुळे स्थानिक पातळीवर अनेकांची घुसमट होणार असून, पक्षश्रेष्ठींच्या भरोशावर राजकारण नकोच… अशी भावना नवोदित व इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.

२०२४ मध्ये तिकीट कोणाला?
राज्यातील सत्तेत आता भाजपा-शिवसेना आणि राष्ट्रवादी असे तिनही बलाढ्य पक्ष ‘महायुती’ म्हणून एकत्र आले आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघाचा विचार करता आगामी २०२४ मध्ये विद्यमान आमदार अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे, अपक्ष राहुल कलाटे, भाजपाचे शंकर जगताप असे चारजण इच्छुक राहणार आहेत. या सर्वांची ‘महायुती’ची उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड असणार आहे. आतापर्यंत भाजपाचे तिकीट नाकारले, तर राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेवू… असा पर्याय होता. मात्र, आता तसे पर्याय नाहीत. काँग्रेस, आम आदमी पार्टी किंवा अन्य प्रादेशिक पक्षांकडून उमेदवारी घेणे परवडणारे नाही. त्यामुळे ज्यांना तिकीट मिळणार नाही, त्यांची प्रचंड घुसमट होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button