मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘सामना’तून अनपेक्षित कौतुक; मराठा आरक्षणासाठी घेतलेले प्रयत्न केले गौरवले!
जरांगे-पाटलांइतकेच फडणवीसांचेही श्रेय – सामना
मुंबई : नेहमी टीकेची झोड उठवणाऱ्या शिवसेनेच्या मुखपत्रातून यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप देण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘सामना’मधून फडणवीस यांच्या संयमी व संवेदनशील भूमिकेचे जाहीर कौतुक करण्यात आले आहे. आंदोलकांचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्याइतकेच या लढ्यातील श्रेय फडणवीस यांचे असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
“मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला आणि आंदोलनाचा शेवट गोड झाला,” अशा शब्दांत फडणवीस यांच्या भूमिकेचा गौरव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या वतीने प्रसिद्ध होणाऱ्या ‘सामना’मधून आली असल्याने, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
“फडणवीस विचलित झाले नाहीत…”
आरक्षणाच्या लढ्यात जरांगे-पाटील यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची असली, तरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे आंदोलन संयमी पद्धतीने हाताळले, असे ‘सामना’त म्हटले आहे. “त्यांच्यावर चौफेर टीका होत असतानाही ते विचलित झाले नाहीत. शेवटी आंदोलनकर्त्यांच्या शक्य त्या सर्व मागण्या मान्य करून ते गावाकडे परतले. ही भूमिका सरकारच्या प्रगल्भतेचे प्रतीक आहे,” असे गौरवोद्गारही सामनामधून नोंदवले गेले.
“जरांगे भले माणूस, पण फडणवीस यांचेही श्रेय तितकेच”
“जरांगे-पाटील यांनी आपले प्राण पणाला लावून आंदोलन यशस्वी केले. त्यांच्या जिद्दीशिवाय मराठा समाजाच्या हाती काहीच लागले नसते. मात्र, यशाचे श्रेय फक्त त्यांचेच नसून, मुख्यमंत्र्यांचेही तितकेच आहे,” असे स्पष्ट मत सामनातून मांडण्यात आले आहे.
‘हे अनाकलनीय आहे’ – शिवसेनेचा टोला
या लढ्यात सर्व टीका मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर झाली, आणि बाकीचे नेते मात्र ‘भले’ ठरले, यावरही सामनातून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. “मुख्यमंत्री म्हणजेच सरकार. इतर मंत्री कितीही ताकदवान असले तरी सरकार मुख्यमंत्र्यांच्या हुकुमावरच चालते. त्यामुळे आंदोलनाचा मार्ग काढताना घेतलेली त्यांची भूमिका महत्त्वाची होती. पण जरांगे यांनी फडणवीसांविषयी अतिजहाल भाषा वापरणे योग्य नव्हते. या साऱ्या प्रकरणात खरे श्रेय घेणारेच टीकेचे धनी ठरले, हे अनाकलनीय आहे,” अशा शब्दांत ठाकरेंच्या शिवसेनेने सूचक टोला हाणला आहे. राजकीयदृष्ट्या ही प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात असून, शिवसेनेच्या भूमिकेत झालेला हा बदल आगामी घडामोडींचा संकेत देतो का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.





