अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही
![Chief Minister Eknath Shinde said that Panchnama of damage caused due to bad weather should be done on war level](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/eknath-shinde-2-780x470.jpg)
राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गेल्या ४८ तासात राज्यात तुफान वादळासह गारांचा पाऊस पडला आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे. राज्यातील अहमदनगर, अकोला, नाशिक, बीड, यवतमाळ, वाशीम या जिल्ह्यांना अवकाळी पावसाने चांगलच झोडपलं आहे. तसेच या गारपिटीने कांदा, द्राक्ष, गहू, आंबा, हरबरा व भाजीपाल्यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या वादळी पावसामुळे अकोल्यातील पारस गावातील एका मंदिराच्या शेडवर झाड कोसळल्याने शेडमधील ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने तेथील शेकडो घरे भुईसपाट झाले आहेत. अशातच राज्यात अवकाळीची परिस्थिती असताना विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या वारीला टार्गेट केलं आहे.
विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी अयोध्या दौऱ्यावरून मुंबईत परतल्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत मी मुख्य सचिव आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात असून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही ठिकाणी कलेक्टरांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांदावर जाऊन शेतीचे नुकसान झालं आहे याचा आढावा घेतला आहे.
तसेच हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करा, असे आदेश मी अयोध्येतूनच दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.