मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगाव येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन

जळगाव | धरणगाव येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात येत असून यामध्ये प्रस्तावित खाटांची वाढ करत एकूण ५० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारले जाणार आहे. या रुग्णालयाची मुख्य इमारत व वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : बोलबच्चन भैरवी असलेल्यांना उत्तर देत नाही; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला
धरणगाव शहराला लागून एकूण २ हेक्टर क्षेत्रफळाच्या या जागेवर उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर उभारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून ३९ कोटी ४६ लाख ७५ हजार इतक्या निधीस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
या श्रेणीवर्धनामुळे धरणगाव तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होणार आहेत. नव्याने विविध वैद्यकीय अधिकारी पदांची निर्मिती करण्यात येणार असून, शस्त्रक्रिया, स्त्रीरोग व प्रसूती, बालरोग, बधिरीकरण आदी सेवांसाठी तज्ज्ञ अधिकारी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे परिसरातील गरजू आणि अत्यवस्थ रुग्णांना अत्याधुनिक रुग्णसेवा उपलब्ध होणार आहे.