डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला आणखी एक मोठा दणका; फार्मा कंपन्यांवर 100% टॅरिफ

Donald Trump | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर दोस्त म्हणत दणक्यांची मालिका सुरूच ठेवली आहे. त्यांनी आता ब्रँडेड (Patented) औषधांच्या आयातीवर थेट 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. हा मोठा कर 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार आहे. अमेरिका फर्स्ट या धोरणांतर्गत अमेरिकेत स्वतःचे औषध कारखाने उभारणाऱ्या कंपन्यांनाच या करातून सूट मिळेल.
यापूर्वी ट्रम्प यांनी 27 ऑगस्टपासून कपडे, दागिने आणि फर्निचर यांसारख्या भारतीय वस्तूंवर 50 टक्के कर लादला होता. ट्रम्प यांच्या या धोरणानंतर भारतीय शेअर बाजार लगेचच हादरला. या निर्णयामुळे भारतीय फार्मा कंपन्यांचे शेअर्स सुमारे 2.6 टक्के खाली आले. सन फार्मा आणि सिप्ला यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 4 ते 5 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
यामुळे निफ्टी 50 आणि सेन्सेक्स या प्रमुख निर्देशांकांनीही नकारात्मक सुरुवात केली. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर संपूर्ण फार्मा सेक्टरवर दबाव आला आहे. भारत हा अमेरिकेला जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. 2024 मध्ये भारताने अमेरिकेला सुमारे 77,000 कोटी रुपयांची औषधे निर्यात केली होती. अमेरिकेतील डॉक्टरांनी लिहिलेल्या प्रत्येक दहा प्रिस्क्रिप्शनपैकी अंदाजे 4 प्रिस्क्रिप्शन भारतीय कंपन्यांनी बनवलेल्या औषधांसाठी असतात.
हेही वाचा : बँकांनी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्राला अर्थसहाय्य करावे; केंद्रीय गृह मंत्री अमित शाह
भारतीय जेनेरिक औषधांमुळेच 2013 ते 2022 दरम्यान अमेरिकेच्या आरोग्य सेवा प्रणालीचे तब्बल 1.3 ट्रिलियन डॉलर्स इतके मोठे बजेट वाचले आहे. डॉ. रेड्डीज, सन फार्मा आणि ल्युपिनसारख्या प्रमुख भारतीय कंपन्या अमेरिकेला जेनेरिकसोबत काही पेटंट औषधेही पुरवतात. ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय अमेरिकेत औषधांचे उत्पादन वाढवून पुरवठा साखळी सुरक्षित करण्याच्या धोरणाचा भाग आहे.
मात्र या धोरणामुळे अमेरिकेतील नागरिकांवरही थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. जेनेरिक औषधे ही ब्रँडेड औषधांपेक्षा 80 ते 90 टक्के स्वस्त असतात आणि अमेरिकेची आरोग्य व्यवस्था मोठ्या प्रमाणावर या जेनेरिक औषधांवर अवलंबून आहे. त्यामुळे जर भविष्यात जेनेरिक औषधांवरही असा मोठा कर लावला गेला तर अमेरिकन नागरिकांसाठी आरोग्यसेवा लक्षणीयरित्या महाग होईल.





