शिवसेनेनंतर राष्ट्रवादीने देखील फोडले नाना पटोले यांच्यावर खापर
![Chhagan Bhujbal said that all these incidents might not have happened if Patole had not resigned](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/nana-patole-and-sharad-pawar-780x470.jpg)
पटोलेंनी राजीनामा दिला नसता तर कदाचित या सगळ्या घटना घडल्या नसत्या
मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातुन नाना पटोले यांना महाविकास आघाडी सरकार कोसळण्यास दोषी धरलं होतं. आता यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी काँग्रेसच्या वादावर भाष्य केलं आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तेव्हा कुणालाही विश्वासात घेतलं नाही. त्यानंतर इतर पेच निर्माण झाले, पुढे सरकार देखील कोसळलं, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे.
पटोले यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होऊ शकलेला नाही. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. नाना पटोले यांनी राजीनामा दिला नसता तर कदाचित या सगळ्या घटना घडल्या नसत्या, असेही छगन भुजबळ म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार पडले किंवा पाडले गेले त्यामागे अनेक कारणे असली तरी मुख्य कारण म्हणजे, विधानसभा अध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांनी दिलेला तडकाफडकी राजीनामा. पटोले यांचा राजीनामा हा शहाणपणाचा निर्णय नव्हता व तेथूनच संकटाची मालिका सुरू झाली. ती नंतर थांबली नाही. विधानसभा अध्यक्षपद हे आघाडी सरकारात महत्त्वाचे ठरते. अध्यक्षपदी पटोले असते तर पुढचे अनेक पेच टाळता आले असते व पक्षांतर करणाऱ्यांना जागेवरच अपात्र ठरवणे सोपे झाले असते, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.