कॅगच्या अहवालातून मोदी सरकारच्या ७ पायाभूत प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार समोर
![CAG report exposes irregularities in 7 infrastructure projects of Modi government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/narendra-modi-4-780x470.jpg)
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या सात पायाभूत प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे नियंत्रण आणि महालेखापाल (कॅग) यांनी समोर आणलं आहे. यामध्ये दिल्लीच्या द्वारका द्रुतगती महामार्गाचा निर्मितीखर्च प्रतिकिलोमीटर १८ कोटींवरून २५० कोटींपर्यंत वाढवल्याचे समोर आले आहे.
कॅगने दिलेल्या अहवालात काय म्हटलं?
भारतमाला प्रकल्प : महामार्ग निर्मितीच्या या प्रकल्पासाठी बांधकामाचा प्रतिकिलोमीटर खर्च १५.३७ कोटी रुपयांवरून तब्बल ३२ कोटी दाखवण्यात आला. त्याशिवाय निविदा प्रक्रियेतही काळेबेरे झाले असून सुमारे ३,५०० कोटी अन्यत्र वळवण्यात आले. सुरक्षा सल्लागाराचीही नेमणूक करण्यात आली नाही.
टोल घोटाळा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या केवळ पाच टोलनाक्यांद्वारे १३२ कोटींचा लूट करण्यात आली. सर्व टोलनाक्यांची तपासणी केल्यास हा आकडा कित्येक पट वाढू शकतो.
हेही वाचा – लोकवस्तीमध्ये कचरा संकलन केंद्र नकोच! आमदार महेश लांडगे यांची भूमिका
आयुष्मान भारत : ७.५ लाख लाभार्थ्यांची केवळ एका मोबाइल क्रमांकावरून नोंद करण्यात आली. तसेच उपचारादरम्यान मृत झालेल्या ८८ हजार रुग्णांचे बिल पास केले.
अयोध्या विकास प्रकल्प : कवडीमोल दराने भूखंड विकत घेऊन तो राम मंदिर ट्रस्टला चढ्या दराने विकण्यात आला. नोंदणीकृत नसलेल्या कंत्राटदारांना पैसे वळते करण्यात आले.
पेन्शनचा निधी फलकांवर खर्च : ज्येष्ठ नागरिक, गरीब, विधवा, अपंगांच्या पेन्शनचा निधी ‘स्वच्छ भारत’ योजनेचे फलक लावण्यासाठी एका रात्रीत वळवण्यात आला.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स : सदोष इंजिन विकसित केल्यामुळे सुमारे १५४ कोटींचे नुकसान झाले.
द्वारका एक्सप्रेस वे : प्रकल्पाच्या बांधकामाचा खर्च प्रतिकिलोमीटर १८ कोटींवरून सुमारे २५० कोटींवर दाखवला आहे.