‘एकनाथ शिंदेंच्या रूसव्या-फुगव्यामागे दिल्लीतील महाशक्तीचा हात’; संजय राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut | विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला बहुमत मिळाल्यानंतर आता राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. सत्तास्थापनेची तारीख ठरलेली असली तरीही मंत्रिमंडळातील खातेवाटपावर चर्चा झालेली नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व बैठका रद्द होत असल्याने चर्चा पुढे सरकत नसल्याचं म्हटलं जातंय. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.
संजय राऊत म्हणाले, की काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची काळजी भाजपाला वाटत नाही. अशा परिस्थितीत सरकार स्थापन होणार आहे तो फार मोठा विनोद असणार आहे. हे सरकार लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवत आहेत. ज्यांनी मतदान केलंय, त्यांचा आपण केलेल्या मतदानावर किंवा निवडून आलेल्या सरकारवर विश्वास नाही. लोक शंका घेत आहेत. यावर निवडणूक आयोगाने खुलासा केला पाहिजे. आज मारकडवाडीत १४४ कलम लावलाय. लोकशाही मार्गाने मतदान घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना घरातून बाहेर पडू नका अशा धमक्या दिल्या जात आहेत. अजून राज्यात सरकार यायचंय. त्या मतदारसंघातून भाजपाचा पराभव झालाय. पण मतदारांना वाटतंय विजयी उमेदवाराला जी मते मिळाली आहेत ती कमी मते आहेत. जिंकून सुद्धा फेरमतदान घेत आहेत, कारण कमी मतदान झालंय.
हेही वाचा – ‘मी पवित्र १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक’; मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त विधान, भाजपा नेते आक्रमक
या देशातील विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यामागे जे रूसवे फुगवे सुरू आहेत, मला वाटकं दिल्लीतील महाशक्ती कार्यक्रम करत आहे. दिल्लीतील एखाद्या महाशक्तीशिवाय एकनाथ शिंदे अशाप्रकारचं धाडस करू शकत नाही. कारण कोणाची हिंमत नाहीय सध्याच्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांविरोधात अशाप्रकारे रुसवे फुगवे करण्याची, असं संजय राऊत म्हणाले.
तीन वर्षांपूर्वी ईडी, सीबीआय, दिल्लीतील गृहमंत्रालयाला घाबरून शिवसेना फोडून पळून गेले. त्यांना तीन वर्षांत असं कोणतं टॉनिक मिळालं की ते दिल्लीला डोळे दाखवून रुसवे फुगवे करून बसलेत. दिल्लीतील महाशक्ती महाराष्ट्रात हा खेळ करतंय आणि हा भाजपातील अंतर्गत खेळ आहे. एकनाथ शिंदे यांच्या मागे शक्तीमोचक वगैरे कोणी नाहीय. कोणी काही फसलं नाहीय. दिल्लीच्या सूचनेनुसार डोंबाऱ्याचा खेळ सुरू आहे. दिल्लीतून डमरू हलतोय. दिल्लीतील महाशक्ती पाठीशी असल्याशिवाय एकनाथ शिंदे असा डाव करू शकत नाहीत, असंही संजय राऊत म्हणाले.





