breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

कसबा पेठ, चिंचवड मतदारसंघांसाठी २७ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक; आमदार लांडगे यांची कसोटी!

पुणे : मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. विधान परिषदेतील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे येथील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी शिंदे गट-भाजपा तसेच महाविकास आघाडी यांच्यात स्पर्धा लागली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांतील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत.

दरम्यान, चिंचवड विधानभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे या दोन्ही मतदार संघात भाजपाचे वर्चस्व आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्‍ध भाजपा असा सामना रंगणार आहे.

निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार, येत्या २७ फेब्रुवारीला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे लवकरच निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

या निवडणूकीसाठीची अधिसूचना ३१ जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून ७ फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. ८ फेब्रुवारी अर्जांची छाननी तर १० फेब्रुवारी पर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणूकांसाठी मतदान २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि या निवडणूकीचा निकाल २ मार्च रोजी जाहीर होईल.

राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपचे दोन आमदार यांचे मागील महिन्यात निधन झाले होते. यात आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ तसेच चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक होईल असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. दरम्यान भाजप विरोधात दोन्ही जागांवर महाविकास आघाडी उमेदवार देण्याची शक्यता आहे.

आमदार महेश लांडगे यांची कसोटी…

पिंपरी-चिंचवडमधील आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक निर्णायक ठरणार आहे. भाजपा निवडणूक प्रभारी माजी नगरसेवक शंकर जगताप आणि दिवंगत आमदार जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यापैकी कोणाला तिकीट मिळणार, याकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. दुसरीकडे, शहराध्यक्ष म्हणून आमदार महेश लांडगे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनिशी उतरल्यास भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून, आमदार लांडगेंसाठी ही निवडणूक कसोटीची ठरणार आहे. कारण, २०१४ पासून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहर भाजपाचे वर्चस्व राखण्यात मोठे योगदान दिले. २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत विजय खेचून आणला. २०१९ मध्ये पुन्हा शहरात भाजपाचे दोन आमदार निवडून आले. ही विजयी मालिका कायम ठेवण्याचे शिवधनुष्य आमदार महेश लांडगे यांना पेलावे लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button