Breaking News: भाजपाचे नेते माजी खासदार निलेश राणे यांचा ‘‘राजकीय सन्यास’’
सक्रीय राजकारणातून कायमचे बाजूला होत असल्याची घोषणा
![Breaking News: 'Political Retirement' of BJP Leader Former MP Nilesh Rane](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Nilesh-Rane-BJP-780x470.jpg)
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राजकारणातून कायमचे बाजूला होण्याची घोषणा केली आहे. त्याबाबत त्यांनी ‘एक्स’ वर आपली भूमिका व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
निलेश राणे हे स्फोटक भूमिका घेणारे आणि शिवसेनेसह उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संजय राउत यांच्याबाबत तिखट शब्दांत टीका करणारे नेते म्हणून ओळखले जातात. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ते चिरंजीव आहेत.
विजया दशमीच्या दिवशीच त्यांनी सोशल मीडियावर आपल्या राजकीय सन्यासाची भूमिका व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की,
नमस्कार,
मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.
मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.
मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा.