‘भाजप आमदार नितेश राणे हरवले आहेत’, मुंबईत बॅनर लावल्याने खळबळ
मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांचे चर्चगेट स्टेशनबाहेर एक बॅनर लावण्यात आला आहे. बॅनरवर नितेश राणे यांचा एक फोटो असून ते हरवले असल्याची माहिती लिहिण्यात आली आहे. तसेच त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीला चक्क कोंबडी बक्षीस देण्यात येईल, असेही लिहिण्यात आले आहे. या बॅनरमुळे आता एकच खळबळ उडाली आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने राडा पाहायला मिळाला. संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग पोलीस नितेश राणेंचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून नितेश राणे अज्ञातस्थळी नॉट रिचेबल आहेत. त्यांची माहिती मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. मात्र नारायण राणे यांच्या घरावर पोलिसांनी लावलेली नोटीस घरातील कर्मचाऱ्याने काढून टाकली. त्यानंतर नितेश राणे पोलिसांसमोर येत नसल्याने मुंबईत पोस्टबाजी करण्यात आली आहे. मात्र, हे बॅनर कोणी लावले आहे, याबाबत काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. तरी बॅनर कोणी लावले असेल, याचीही जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याने काल संध्याकाळी राडा झाला. सिंधुदुर्ग जिल्हा बँक मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर जमले. शिवसैनिकांनी फटाके फोडत जल्लोष केला. तर भाजप कार्यकर्त्यांनी दुसऱ्या बाजूने घोषणाबाजी केली. पोलिसांच्या आवाहनानंतर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते पांगले आणि तणाव निवळला.