तुरुंगात जाण्यापूर्वी एक्झिट पोलवर मोठं विधान; अरविंद केजरीवाल काय म्हणाले?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/mahaenews-100-780x470.jpg)
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाची मुदत संपली आहे. आज तिहार तुरूंग अरविंद केजरीवाल आत्मसमर्पण करणार आहेत. केजरीवाल 21 दिवस प्रचारासाठी बाहेर पडले होते, कोर्टाकडे आणखी जामीनासाठी वैद्यकीय कारण देत मुदत वाढवून मागितली होती. मात्र न्यायालयाने मुदत वाढवून दिली नाही. त्यामुळे आज केजरीवाल आत्मसमर्पण करतील. तुरुंगात जाण्यापूर्वी अरविंद केजरीवालांनी एक्झिट पोलवर मोठं विधान केलं आहे.
माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मी 21 दिवस निवडणूक प्रचारासाठी बाहेर पडलो होतो. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे खूप खूप आभार. आज मी तिहार तुरूंगात जाऊन आत्मसमर्पण करत आहे. दुपारी 3 वाजता घरून निघणार असून सर्वप्रथम मी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहणार आहे. त्यानंतर मी हनुमानजींचा आशीर्वाद घेण्यासाठी कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात जाणार आहे. त्यानंतर मी पक्ष कार्यालयात जाऊन सर्व कार्यकर्त्यांची आणि पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार आणि तिथून मी तिहार तुरूंगामध्ये आत्मसमर्पण करणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – जगात कोणत्या देशाकडे किती सोने, भारताच्या तिजोरीत किती आहे सोने
सर्व एक्झिट पोल खोटे आहेत. कारण भाजपला जास्त जागा द्याव्या लागतील हे वरून आले असावे. तीन दिवसांपूर्वी बनावट एक्झिट पोल घेण्याची काय गरज होती, असे केजरीवाल म्हणाले. ते म्हणाले, एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका. मी तुरुंगात जात आहे, परत कधी येईन माहीत नाही. पण माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब देशासाठी आहे. देश वाचवण्यासाठी मी तुरुंगात जात असल्याचं अरविंद केजरीवाल म्हणाले. तुरुंगात जाण्याआधी अरविंद केजरीवाल यांनी आई-वडिलांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. तसेच मुलांना मिठीसुद्धा मारली.