सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; महागाई भत्त्यात वाढ

State Government Dearness Allowance: राज्य सरकारने महागाई भत्त्याच्या दरामध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शासकीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे. वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत याबाबत विधायक निवेदन सादर केले. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आता महागाई भत्त्याचा दर ५८ टक्के करण्यात आला आहे. आतापर्यंत हा दर ५५ टक्के एवढा होता.
राज्य सरकारने महागाई भत्याच्या दरात सुधारणा करण्याबाबतचा शासन आदेश देत सांगितले की, १ जुलै, २०२५ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ५५ टक्के वरुन ५८ करण्यात यावा. दिनांक १ फेब्रुवारी २०२६ पासून सदर महागाई भत्ता वाढ रोखीने देण्यात यावी.
हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात थकीत वेतनवाढीचा हप्ता जमा; शासनाने केली 100 कोटींची तरतूद
जुलै ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकी मार्च २०२६ मध्ये देण्यात येणार आहे. यानंतरच्या कालावधीसाठीचे आदेश नंतर काढण्यात येणार आहे. थकीत महागाई भत्ता हा टप्प्याटप्प्याने मिळणार, असेही सरकारने शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या निर्णयानंतर महाराष्ट्रातील तब्बल ५.१६ लाख राज्य सरकारी कर्मचारी आणि ८.७२ लाख पेन्शनधारकांना हा महागाई भत्ता मिळणार आहे. शासकीय कर्मचारी, अनुदानित संस्था, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांच्या पैशामध्ये काहीशी वाढ झाल्याने अनेकांना समाधान मिळेल.




