अजित पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादीच्या ७ आमदारांनी सोडली साथ; सत्ताधारी पक्षात झाले सामील

Nagaland Nationalist Congress Party : नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) सर्व सात आमदारांनी सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) मध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला.
या सातही आमदारांनी प्रत्यक्ष हजर राहून एनडीपीपीत विलीन होण्याचे औपचारिक पत्र सादर केले. हे विलीनीकरण संविधानाच्या दहाव्या अनुसूचीनुसार कायदेशीर आहे, असे विधानसभा अध्यक्ष शारिंगैन लोंगकुमेर यांनी सांगितले. यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील एनडीपीपीला 60 सदस्यांच्या विधानसभेत पूर्ण बहुमत प्राप्त झाले आहे. या विलीनीकरणामुळे एनडीपीपीच्या आमदारांची संख्या 25 वरून थेट 32 वर पोहोचली आहे.
2023 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 12 जागा जिंकून राज्यातील तिसरा मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले होते. यानंतर पक्षात फूट पडली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार असे दोन गट पडले. महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचा थेट परिणाम दिसला. नागालँडमधील पक्षातील आमदारांनी अजित पवार यांना साथ दिली.
हेही वाचा – ‘ऑपरेशन सिंदूर हे नारीशक्तीच्या सामर्थ्याचे प्रतीक’; पंतप्रधान नरेंद्र मोदी
मात्र, पक्षातील सात आमदारांनी एनडीपीपीत पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या आमदारांना पक्षांतर्गत बंदी कायद्यांतर्गत कारवाई करणार असून, लवकरच आम्ही लवकरच आमदारांशी चर्चा करून कायदेशीर आणि राजकीय पातळीवर याचा सामना करू, असे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी सांगितले.