‘लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका’; बच्चू कडूंचं विधान
![Bacchu Kadu said that if there is no money for Ladaki Bahin Yojana, sell the Governor's bungalow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Bacchu-Kadu-3-780x470.jpg)
मुंबई | राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रूपये मिळणार आहेत. या योजनेवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका, असा सल्लाही बच्चू कडू यांनी दिला.
आमदार बच्चू कडू म्हणाले, दुधाला भाव द्या, कामगाराला मजुरी द्या. चालकांसाठी चांगली योजना असली पाहिजे, यासाठी पैसे नसतील मी त्यांना चांगला पर्याय देतो. त्यांनी राज्यपाल यांचा ४० एकरातील बंगला विकावा. त्याचे एक लाख कोटी रुपयांपर्यंत पैसे येतील. ते पैसे तिकडे वापरा. राज्यपाल यांना ४० एकर जागा कशाला हवी? त्यांना नवीन तीन, चार मजली इमारत बांधून द्या. योजना आणायला काही हरकत नाही, पण त्या योजना कोणासाठी आणाव्यात हे महत्वाचं आहे. योजना कष्टकऱ्यांसाठी असायला पाहिजेत.
हेही वाचा – अजित गव्हाणे यांच्या सूचनेनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे!
देशात श्रीमंतच अधिक श्रीमंत होत चालला आहे. मुंबईत पारसींकडे महत्वाची ६ हजार एकर जमीन आहे. इंग्रजांकडून त्यांनी बक्षिस म्हणून मिळवली. कष्ट करणाऱ्यांना वन बीएचके घर भेटणे खूप मोठं झालं आहे. कष्ट करणाऱ्यांचे मूल्य जपलं पाहिजे. सरकारला आम्ही शेतकऱ्यांचा वाटा बजेटमध्ये किती आहे हे विचारत आहे. त्यांचा या बजेटमध्ये वाटाच दिसत नाही, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला. सध्या मोठी विषमता सुरू आहे. ही विषमता तोडली पाहिजे. यासाठी आम्ही ९ ऑगस्टला संभाजीनगरला मोठ्या मोर्चाचे आयोजन करत आहोत, असं बच्चू कडू म्हणाले.
आम्ही विधानसभेसाठी संघटन करत आहोत, आता आमचे दोन ते तीन सदस्य आहेत. आता आम्ही २० ते २५ जागांसाठी तयारी करत आहोत. आतापर्यंत आम्हाला अनेकांचे अर्ज आले आहेत, असंही बच्चू कडू म्हणाले. काँग्रेसनेही ज्या योजना आणल्या त्याच योजना आता महायुती सुद्धा आणत आहे. आम्ही आता त्यांना मागण्यांचे पत्र देणार आहे, त्यात आम्ही १६ मुद्दे देणार आहोेत. त्या योजना पूर्ण केल्या तर आम्ही निवडणुकाच लढणार नाही, महायुतीने मान्य केलं तर महायुतीला पाठिंबा देणार. महाविकास आघाडीने मान्य केलं तर त्यांना पाठिंबा देणार, असंही बच्चू कडू म्हणाले.